
कामा रुग्णालयात परिचारिकांची निदर्शने
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : महिलांसाठीच्या एकमेव कामा अँड अल्बलेस रुग्णालयातील परिचारिका या चार दिवसांपासून संपावर आहेत. सरकार आपल्या मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून याविषयी मार्ग न काढल्यास संप आणखी चिघळेल, असा इशारा यावेळी परिचारिकांनी दिला आहे.
शुक्रवारी सकाळी कामा रुग्णालयातील परिचारिका आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. सरकारविरोधात घोषणाबाजी करत जुनी पेन्शन ही मिळालीच पाहिजे यासाठी शक्तिप्रदर्शन केले. यावेळेस जवळपास शंभरहून अधिक परिचारिका आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी उपस्थित होते. आमदार-खासदारांना पेन्शन मिळते, मग आपल्यालाच का नाही, असा सवाल ही यावेळेस कर्मचाऱ्यांनी विचारला. ३० ते ३५ वर्षे सरकारी नोकरीत काम करूनही जर पेन्शन मिळणार नसेल तर संपाशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरत नसल्याचे कामा रुग्णालयाच्या परिचारिका अंजली कुलथे यांनी साांगितले. प्रत्येक छोट्या-मोठ्या कामांसाठी वॉर्ड बॉय किंवा परिचारक लागतो, पण पेन्शन देण्याच्या वेळेस मात्र सरकारला विसर पडतो. त्यामुळे यावेळेस आम्ही संपातून मागणी मान्य होईपर्यंत माघार घेणार नाही, असे स्पष्ट मत कामगारांनी व्यक्त केले आहे.