आशा भोसले यांना आज ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आशा भोसले यांना आज ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान होणार
आशा भोसले यांना आज ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान होणार

आशा भोसले यांना आज ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान होणार

sakal_logo
By

मुंबई. ता. २३ : आपल्या सुमधुर स्वरांनी गेली सात दशके रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या पद्मविभूषण आशा भोसले यांना उद्या (ता. २४) राज्याचा सर्वोच्च ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. २०२१ मध्ये आशा भोसले यांना हा पुरस्कार जाहीर झाला होता. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या कार्यक्रमात आशा भोसले यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

कोणत्याही क्षेत्रात निरपेक्ष वृत्तीने सेवा करणाऱ्या व्यक्तीला सर्वोच्च ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने राज्य सरकारच्या वतीने गौरवण्यात येते. गेट वे ऑफ इंडिया येथे ‘आवाज चांदण्याचे’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी सुदेश भोसले, साधना सरगम, ऋषिकेश कामेरकर, आर्या आंबेकर, बेला शेंडे, मधुरा दातार हे कलाकार आशा भोसले यांच्या सदाबहार गीतांचा सुमधुर कार्यक्रम सादर करणार आहेत. अभिनेते सुमित राघवन हे या कार्यक्रमाचे निवेदन करणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असणार आहे. या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

आशा भोसले यांनी आतापर्यंत ११ हजारहून अधिक गाणी गायली आहेत. तसेच २० हून अधिक भाषांमध्ये त्यांनी गाणी म्हटली आहेत. विविध भाषांमध्ये हजारो गाणी गायल्यामुळे २०११ मध्ये त्यांचे नाव गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आले. आशा भोसले यांना १८ वेळा फिल्मफेअरसाठी नामांकन मिळाले होते. शुक्रवारी होणाऱ्या या पुरस्कार सोहळ्यास सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने करण्यात आले आहे.