मालमत्ता कर थकबाकीदार रडारवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मालमत्ता कर थकबाकीदार रडारवर
मालमत्ता कर थकबाकीदार रडारवर

मालमत्ता कर थकबाकीदार रडारवर

sakal_logo
By

मुंबई, ता. २३ : मालमत्ता कर थकवणारे पुन्हा महापालिकेच्या रडारवर आले असून त्याच्यावर कारवाई सुरू केली आहे. त्याअंतर्गत ६७ थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. सर्व मालमत्ताधारकांकडे मिळून २६७ कोटी ८८ लाख रुपयांचा मूळ कर आणि ८७ कोटी ३१ लाखांचा दंड अशी एकूण ३५५ कोटी १९ लाख रुपयांची रक्कम थकीत आहे. संपूर्ण रकमेच्या वसुलीसाठी ६७ थकबाकीदारांच्या इतर स्थावर मालमत्ता व गुंतवणुकीचा शोध घेण्यासाठी महापालिकेने व्यावसायिक संस्थेची नेमणूक करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

मालमत्ता कर म्हणजे पालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत. मालमत्ता कर देयके मिळाल्यापासून ९० दिवसांच्या आत तो महापालिकेकडे जमा करणे आवश्यक आहे. त्या कालावधीत कर न भरल्यास पालिकेकडून टप्पेनिहाय कारवाई करण्यात येते. ‘डिमांड लेटर’ पाठवण्यात येते. २१ दिवसांच्या अंतिम नोटिशीनंतरही कराचा भरणा न करणाऱ्या थकबाकीदारांचा पाणीपुरवठा खंडित करणे, मालमत्ता जप्ती, लिलाव आदी कारवाई महापालिका प्रशासनाकडून केली जाते.

थकबाकीदारांच्या नावे नोंदणीकृत व्यवहार केलेल्या स्थावर मालमत्तांचा शोध घेणे व इतर माहिती काढण्यासाठी व्यावसायिक संस्थेची नेमणूक केली जाणार आहे. नोंदणीकृत मालमत्तांच्या मालकीचे कागदोपत्री पुरावे गोळा करणे, थकबाकीदारांचे हितसंबंध आणि संचालक पद असलेल्या व्यावसायिक संस्थांचा शोध घेणे, त्या संस्थांमध्ये थकबाकीदाराची गुंतवणूक आणि आर्थिक हितसंबंध स्थापित करणे, थकबाकीदारांच्या मालमत्तेवरील बोजा शोधण्याकामी दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये शोध घेणे आदी कामे व्यावसायिक संस्थेमार्फत करून घेण्यात येणार आहेत.

शोधमोहिमेसाठी एजन्सी
करनिर्धारण व संकलन खात्याने एकूण ३५५ कोटी १९ लाख रुपयांच्या थकीत रक्कम वसुलीसाठी ६७ थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत. निवासी, औद्योगिक, वाणिज्य आणि खुली जागा अशा विविध वर्गवारीअंतर्गत असणाऱ्या ६७ थकबाकीदार धारकांचा त्यामध्ये समावेश आहे. संपूर्ण ३५५ कोटी १९ लाखांची वसुली करता यावी म्हणून ६७ थकबाकीदारांच्या नावे असणाऱ्या इतर स्थावर मालमत्ता व गुंतवणुकीचा शोध घेण्यासाठी व्यावसायिक संस्थेची नेमणूक करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

अशी आहे थकबाकी
- एकूण मालमत्ता धारक ः ६७
- मूळ कर ः २६७ कोटी ८८ लाख
- दंड ः ८७ कोटी ३१ लाख
- एकूण ः ३५५ कोटी १९ लाख