
फेसबुकवरील ग्रुप ही ‘कॉपीराईट’ मालमत्ता नाही!
मुंबई, ता. २९ : फेसबुक ग्रुप हा बौद्धिक किंवा ट्रेडमार्क किंवा कॉपीराईट मालमत्तेमध्ये (ट्रेडमार्क आणि इंटेलेक्च्युअल) येऊ शकत नाही. त्यामुळे अशा ग्रुपच्या मालकीचा वाद ट्रेडमार्कसंबंधित दाव्यांमध्ये येऊ शकत नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाने एका प्रकरणात सुनावले आहे. शिवाय न्यायालयाने याचिका नामंजूर केली.
मुंबई सत्र न्यायालयाने दिलेल्या निकालात फेसबुक ग्रुपच्या मालकीसंबंधित वाद ट्रेडमार्क आणि इंटेलेक्च्युअल मालमत्तेमध्ये येऊ शकतो, असे स्पष्ट केले होते. हा निर्णय उच्च न्यायालयाचे न्या. नितीन सांब्रे यांच्या खंडपीठाने रद्दबातल केला. फेसबुक ग्रुप हा नोंदणीकृत ट्रेडमार्क नाही. केवळ ग्रुपच्या सदस्यांना मते, फोटो व्यक्त करण्यासाठी आणि अनुभव शेअर करण्यासाठी हा ग्रुप असतो. त्यामुळे फेसबुक ग्रुप हा ट्रेडमार्क आणि कॉपीराइट मालमत्तेमध्ये येऊ शकत नाही. त्यामुळे त्याची मालकी परत करणे आणि पूर्ववत करणे, असे प्रकार होऊ शकत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
हिमालयन क्लब या फेब्रुवारी १९२८ मध्ये नोंदणी झालेल्या क्लबने उच्च न्यायालयात याचिका केली होती. हिमालयन क्लबमध्ये वेगवेगळ्या प्रकाशनांचे आणि वाचनालयांचे साहित्य असते आणि वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यांनी त्यांच्या एका कर्मचाऱ्याला फेसबुकवर ग्रुप तयार करायला सांगितले होते. यानुसार कंवर सिंह यांनी एक समूह तयार केला; मात्र कालांतराने या समूहात क्लबच्या पदाधिकाऱ्यांऐवजी सिंह यांचा वरचष्मा होऊ लागला आणि ते मालकी हक्क दाखवू लागले, असा आरोप करण्यात आला आहे. क्लबने दिवाणी न्यायालयात याबाबत दिवाणी दावा दाखल केला; मात्र फेसबुक मालकी ही ट्रेडमार्क आणि इंटेलेक्च्युअल मालमत्तेमध्ये येते. त्यामुळे सत्र न्यायालयात यावर सुनावणी होऊ शकत नाही, असे म्हणत न्यायालयाने दावा नामंजूर केला. याविरोधात क्लबने उच्च न्यायालयात याचिका केली होती.