‘मायक्रो प्लांटेशन’साठी पालिकेची मार्गदर्शक तत्त्वे

‘मायक्रो प्लांटेशन’साठी पालिकेची मार्गदर्शक तत्त्वे

मुंबई, ता. १० : मुंबईतील हरितीकरण वाढवण्यासाठी महापालिकेच्या उद्यान विभागाने पुढाकार घेतला आहे. घरच्या घरी सूक्ष्म रीतीने हरितीकरण करण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात येत आहेत. पुढील सहा महिन्यांत त्यावरील आधारित पुस्तिकही प्रकाशित केली जाणार आहे, अशी माहिती उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली. मुंबईला ‘हरित शहर’ बनवण्यासाठी ‘मायक्रो प्लांटेशन’च्या अनुषंगाने गाईडलाईन तयार करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुंबईत प्रामुख्याने तीन स्तरांवर हरितीकरण वाढवण्यावर भर देण्यात येतो. व्यक्तिगत स्तराचा विचार केल्यास अनेक जण घर, खिडक्या आणि बाल्कनीमध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करतात. मध्यम स्तरामध्ये इमारतींच्या मोकळ्या जागा आणि सामुदायिक वापराच्या ठिकाणी वृक्षारोपण होते. मोठ्या स्तरावरील वृक्षारोपण मोकळे सार्वजनिक भूखंड, रस्ते, मैदाने इत्यादी ठिकाणी केले जाते.

अनेक नागरिक वृक्षारोपणाची आवड जोपासतात. सामाजिक संघटनाही वृक्षारोपण उपक्रमांमध्ये सहभाग घेत असतात; मात्र वृक्षारोपण करण्याबाबतची योग्य माहिती त्यांना नसते. ते आपल्या आवडीप्रमाणे ढोबळपणाने वृक्षारोपण करतात; पण त्याला योग्य यश मिळत नसल्याने त्यांची सर्व मेहनत वाया जाते. त्यामुळे वृक्षारोपणाची पद्धत, रोपांची निवड, त्याचे संगोपन आणि घ्यावयाची काळजी याबाबतची माहिती पुरवणे गरजेचे असते. त्यासाठी उद्यान विभागाकडून वृक्षारोपणाविषयी काही मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात येत आहेत. त्यामध्ये वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट (इंडिया) यांच्यासह विविध प्राधिकरणांचे अधिकारी, हरित तज्ज्ञ, वास्तुतज्ज्ञ, विकासक संघटना, आरेखक, कॉर्पोरेट्स, देणगीदार, शैक्षणिक संस्था, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांचा सहभाग असणार आहे. त्यांच्या माध्यमातून मार्गदर्शक तत्त्वे पर्यावरणप्रेमींपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यासाठी पुस्तिका प्रकाशित केली जाणार असून त्यावरही काम सुरू झाले आहे. मुंबईला ‘हरित शहर’ बनवण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग महत्त्वाचा असल्याने त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत, असे जितेंद्र परदेशी यांनी सांगितले.
...........
तीन स्तरांवर हरितीकरण
- व्यक्तिगत स्तर ः घर, खिडक्या आणि बाल्कनी
- मध्यम स्तर ः इमारतींच्या मोकळ्या जागा आणि सामुदायिक वापराची ठिकाणे
- मोठा स्तर ः मोकळे सार्वजनिक भूखंड, रस्ते, मैदाने इत्यादी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com