पावसाळी आजार रोखण्यावर पालिकेचा भर

पावसाळी आजार रोखण्यावर पालिकेचा भर

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २२ : पावसाळ्यात महापालिका क्षेत्रामध्‍ये हिवताप, डेंगी व तत्‍सम आजारांना प्रतिबंध घालण्यास महापालिकेने आतापासूनच प्रयत्न सुरू केले आहेत. पालिकेच्‍या सार्वजनिक आरोग्‍य व कीटकनाशक विभागाने नियमित उपाययोजना हाती घेतल्‍या असून त्यांची वेगाने अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.

महापालिकेच्या सर्व विभागीय कार्यालयांच्या ठिकाणी डास प्रतिबंधाच्या अनुषंगाने पावसाळापूर्व कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पाण्याच्या टाक्या डास प्रतिबंधक स्थितीत करणे, अडगळीतील वस्तू निष्कासित करणे यात अपेक्षित आहे. तसेच डासांच्या उत्पत्ती स्थानांमध्ये पाण्याच्या टाक्या, टायर, इतर वस्तू, पेट्री प्लेट्स, फेंगशुई झाडे, मनी प्लांट आदी ठिकाणीही कार्यवाही अपेक्षित आहे. याबाबतच्या सूचनाही विभागीय पातळीवर देण्यात आल्या आहेत. पालिकेतर्फे डेंगी आणि चिकनगुनिया प्रसारक (एडिस) डासांच्या सर्वेक्षणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. कीटकनाशक विभागाचे अधिकारी, कर्मचारी व कामगार यांच्या माध्यमातून हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती आढळणाऱ्या ठिकाणी धूम्रफवारणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

खासगी सोसायट्यांमध्ये कीटकनाशक विभागाकडून तपासणी करण्याच्या तसेच सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना किंवा मालकांना त्यांच्या परिसरात डेंगी, हिवताप प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत; तर बांधकाम सुरू असणाऱ्या ठिकाणी स्वयंसेवी संस्थांच्या स्वयंसेवकांकडून अळीनाशकांची फवारणी केली जात आहे. तसेच बांधकाम कामगारांच्या राहत्या जागेतही भिंतींवर इनडोअर रेसिड्यूल स्प्रेइंग (आयआरएस) कीटकनाशकांची फवारणी करण्याचे निर्देश दिले आहेत. झोपडपट्टी भागात पाण्याच्या टाक्या झाकून ठेवण्याबाबत तसेच अडगळीतील जागेच्या वस्तू शोधून निष्कासित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

लेप्टो नियंत्रणासाठी मोहीम
लेप्टोस्पायरोसिस नियंत्रणाच्या अनुषंगाने एक विशेष मोहीम मार्च २०२३ पासून राबवण्यात येत आहे. याअंतर्गत पाणी साठवणूक केलेल्या ठिकाणांची यादी आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून प्राप्त केली आहे. या ठिकाणी उंदरांच्या संख्येत घट करण्याच्या दृष्टीने प्रत्येक महिन्यात विषारी गोळ्यांचा वापर करून कार्यवाही करण्यात येत आहे. तसेच उंदीर पकडण्यासाठी सापळ्यांचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

डास निर्मूलन समिती
पालिका लवकरच विविध शासकीय, निमशासकीय यंत्रणांचा समावेश असणारी डास निर्मूलन समितीची बैठक आयोजित करणार आहे. केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग, राज्‍य सार्वजनिक बांधकाम विभाग, मध्‍य रेल्‍वे, पश्चिम रेल्‍वे, म्‍हाडा, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मुंबई विमानतळ, मुंबई पोर्ट ट्रस्‍ट, लष्कर, नौदल, वायूदल, सैन्‍यदल अभियांत्रिकी सेवा, बेस्‍ट, डाक विभाग, एमटीएनएल, बीएसएनएल, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि., भाभा अणुसंशोधन केंद्र, महावितरण, दुग्ध विभाग अशा शासकीय, निमशासकीय यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी, प्रतिनिधी या बैठकीत सहभागी होतील.

यंत्रणेची तयारी
१) संपूर्ण २२७ प्रभागांमध्ये २२७ धूम्रफवारणी यंत्रे कार्यरत
२) फवारणीसाठी कीटकनाशकांचा पुरेसा साठा उपलब्ध
३) मनुष्यबळ, सामुग्रीची ने-आण करण्याकरिता एकूण १०७ वाहने उपलब्ध
४) कीटकनाशक फवारणीकरिता १ हजार २४५ स्टीरप पंप उपलब्ध
५) एकूण ६६ हजार ९५९ ठिकाणी गप्पी मासे सोडून डासांच्या अळ्यांवर नियंत्रण

नागरिकांकडून अपेक्षा
१) घरासभोवतालचे अडगळीतील साहित्य काढून टाकावे.
२) पाण्याच्या टाक्या झाकून ठेवाव्यात.
३) टायर्स, भंगार साहित्य, डबे आदी निष्कासित करावेत.
४) घरातील शोभिवंत फुलदाण्या, त्याखालील बशा, शोभिवंत कृत्रिम कारंजी, फेंगशुईची झाडे यामधील पाणी आठवड्यातून कमीत कमी दोन वेळा बदलावे. त्यात पाणी भरण्याआधी या वस्तू आतील बाजूने कोरड्या पुसून घ्याव्यात.
.......

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com