पालिकेचा सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित :

पालिकेचा सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित :

पालिकेचा सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित
एम पश्चिम विभाग कार्यालयाच्या गच्चीवर दरमहा पाच हजार युनिट विजेची निर्मिती
--

मुंबई महापालिकेच्या ‘एम पश्चिम’ विभाग कार्यालयाच्या गच्चीवर सौरऊर्जा यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. या यंत्रणेद्वारे ५० किलोवॉट क्षमतेच्‍या सौरऊर्जा प्रकल्पाद्वारे दरमहा पाच हजार युनिट विजेची निर्मिती केली जाणार आहे‌. तिचा वापर विभाग कार्यालयासाठीच करण्यात येणार आहे. परिणामी दरमहा सुमारे ४२ हजार ५०० रुपयांची बचत शक्य होईल, अशी माहिती ‘एम पश्चिम’ विभागाचे सहायक आयुक्त विश्वास मोटे यांनी दिली.
यंत्रणेबाबत अधिक माहिती देताना मोटे यांनी सांगितले, की एम पश्चिम विभाग कार्यालयाच्या गच्चीचा आकार साधारण १८ हजार चौरस फूट इतका आहे. त्यापैकी सुमारे २ हजार १०० चौरस फूट जागेत ९३ सौरऊर्जा पॅनल (रूफ टॉप सोलर सिस्टीम) बसवण्यात आले आहेत. पॅनलद्वारे मिळणारी विद्युतऊर्जा ‘डीसी’ (डायरेक्ट करंट) प्रकारची आहे. वीजपुरवठ्यास आणि विद्युत उपकरणांना ‘एसी’ (अल्टर्नेटिंग करंट) प्रकारची विद्युत ऊर्जा लागते. त्यामुळे सौरऊर्जा पॅनलद्वारे प्राप्त होणाऱ्या ‘डीसी’ ऊर्जेचे रूपांतर सर्वप्रथम ‘एसी’मध्ये केले जात आहे. त्यानंतर ती ऊर्जा विद्युत पुरवठादार कंपनीला मीटरच्या माध्यमातून दिली जाते. त्यानुसार विद्युत पुरवठादार कंपनीला जेवढी ऊर्जा जाईल त्याचे गणन मीटरद्वारे करण्यात येते. सौरऊर्जा पॅनलद्वारे जेवढी वीजनिर्मिती झाली त्याचीच किंमत निर्धारित दरानुसार मासिक बिलातून वजा करण्यात येणार आहे.
सौरऊर्जा प्रकल्प उभारण्‍यासाठी ३४ लाख ६० हजार रुपयांचा खर्च झाला असून तो पुढील सहा वर्षांत वसूल होईल, असा विश्‍वास ‘एम पश्चिम’ विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील तावडे यांनी व्‍यक्‍त केला.


- ५० किलोवॉट क्षमतेच्‍या सौरऊर्जा प्रकल्पाद्वारे दरमहा साधारण पाच हजार युनिट विजेची निर्मिती केली जाणार आहे‌. ज्यामुळे दरमहा सुमारे ४२ हजार ५०० रुपयांच्‍या वीजखर्चाची बचत होणार आहे.
- सौरऊर्जा प्रकल्पाचे आयुर्मान सुमारे २५ वर्षे इतके आहे. त्यामुळे पुढील २५ वर्षांत साधारण १ कोटी २७ लाखांची विद्युत खर्चातील बचत साध्य होणार आहे. भविष्यात वाढू शकणाऱ्या विद्युत दरांचा अंदाज बांधल्यास खर्चात होणारी बचत निश्चितच १ कोटी २७ लाखांपेक्षा अधिक असेल.
.......

वीज वाचवण्यासह पर्यावरणपूरक ऊर्जेचा वापर करण्याबाबत जनजागृती साधणे हा प्रकल्पाचा उद्देश आहे. ‘एम पूर्व’ विभागातील इतर इमारतींवरही सौरऊर्जा आधारित यंत्रणा संबंधितांनी बसवावी आणि पर्यावरणपूरकता जपावी यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.
- विश्वास मोटे, सहायक आयुक्त, एम पश्चिम
...........

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com