पालिकेच्‍या‍ गोरेगाव कार्यालयावरही सौरऊर्जा प्रकल्‍प

पालिकेच्‍या‍ गोरेगाव कार्यालयावरही सौरऊर्जा प्रकल्‍प

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : महापालिकेने पर्यावरण संवर्धन व ऊर्जाबचतीच्या उद्देशाने सर्व कार्यालयांवर सौरऊर्जा प्रकल्‍प कार्यान्वित करण्यास सुरुवात केली आहे. चेंबूर विभाग कार्यालयापाठोपाठ आता गोरेगाव (पश्चिम) येथील पी दक्षिण विभाग कार्यालयाच्‍या गच्चीवर सौरऊर्जा यंत्रणा कार्यान्वित केली आहे. या यंत्रणेद्वारे उपलब्ध होणाऱ्या विद्युत ऊर्जेचा वापर विभाग कार्यालयासाठी करण्यात येणार असून यामुळे दरमहा सुमारे २७ हजार रुपयांची वीजखर्चाची बचत होणार आहे, अशी माहिती सहायक आयुक्त राजेश अक्रे यांनी दिली आहे.
पी दक्षिण विभाग कार्यालयाच्या गच्चीवर रविवार (ता. ३०) पासून सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला असून त्या माध्यमातून दरमहा ३ हजार युनिट्सची निर्मिती केली जाणार आहे. या प्रकल्‍पाची क्षमता २५ किलो वॉट वीजनिर्मितीची आहे. यामुळे २७ हजार रुपयांच्या बचतीसह पर्यावरणपूरकताही जपण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. प्रकल्पाचे आयुर्मान २५ वर्षे असून प्रकल्प खर्च अवघ्या पाच वर्षांत वसूल होणार आहे. पी दक्षिण विभाग इमारतीत २५ किलो वॉट ऑन-ग्रीड सोलर रूफटॉप प्लांटचा पुरवठा, स्थापना, चाचणी आणि कार्यान्वित करणे विशेष (इनोव्हेटिव्ह) प्रकल्प निधीअंतर्गत अक्षय ऊर्जानिर्मिती प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे.


भविष्याची गरज पाहता, वीजनिर्मितीसाठी पर्यावरणपूरक स्रोतांचा विचार करणे गरजेचे आहे. वीज वाचवण्यासह पर्यावरणपूरकता जपणे आणि पर्यावरण पूरक ऊर्जेचा वापर करण्याबाबत जनजागृती साधणे, हा या प्रकल्पाचा उद्देश आहे.
– राजेश अक्रे, सहायक आयुक्त

अशी असेल यंत्रणा
पी दक्षिण विभाग कार्यालयात टाटा पॉवर प्रा. लि.मार्फत वीजपुरवठा करण्यात येतो. याव्यतिरिक्त इमारतीच्या टेरेसवर २५ किलोवॉट क्षमतेचा ऑनग्रीड रुफ टॉप सोलर पॉवर प्लॅन्ट बसवण्यात येवून, त्याद्वारे निर्मित होणाऱ्या सौरऊर्जेचा वापर करून विद्युत पुरवठ्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याद्वारे प्राप्त होणारी विद्युत ऊर्जा ही ‘डीसी’ प्रकारची आहे. विद्युत पुरवठ्यास आणि विद्युत उपकरणांना ‘एसी’ प्रकारची विद्युत ऊर्जा लागत असल्याने सौर ऊर्जा पॅनलद्वारे प्राप्त ‘डीसी’ ऊर्जेचे रूपांतर सर्वप्रथम ‘एसी’ मध्ये केले जात आहे. त्यानंतर ही ऊर्जा विद्युत पुरवठादार कंपनीला मीटरच्या माध्यमातून दिली जात आहे. यानुसार विद्युत पुरवठादार कंपनीला जेवढी ऊर्जा जाईल, त्याचे गणन मीटरद्वारे करण्यात येत आहे. सौरऊर्जा पॅनलद्वारे जेवढी वीजनिर्मिती झाली आहे, तेवढ्या विजेची किंमत ही निर्धारित दरानुसार मासिक विजेच्या बिलातून वजा करण्यात येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com