विधी परीक्षेच्या हॉलतिकिटांत गोंधळ

विधी परीक्षेच्या हॉलतिकिटांत गोंधळ

मुंबई, ता. २ : मुंबई विद्यापीठाच्या विधी विभागाच्या पदवी परीक्षेच्या तृतीय वर्षाच्या परीक्षा बुधवारी (ता. ३) सुरू होत असताना या परीक्षेला बसलेल्या अनेक विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटांवर विषय बदली झाल्याची बाब समोर आली आहे. ऐनवेळी विषयच बदली झाल्याने अनेक विद्यार्थी संकटात सापडले असून काहींनी आता तक्रारी करण्यापेक्षा यादरम्यान ‍देण्यात आलेल्या विषयाची तयारी करून परीक्षेला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आले.
विद्यापीठाच्या तृतीय वर्ष एलएलबी अभ्यासक्रमाची सहाव्या सत्राची परीक्षा ही बुधवारपासून सुरू होत असून ती २४ मेपर्यंत चालणार आहे. अभ्यासक्रमाच्या पाचव्या सत्र परीक्षेवेळी विद्यार्थ्यांनी सहाव्या सत्र परीक्षेचा अर्ज भरला होता. अर्ज भरताना विद्यार्थ्यांना एकूण आठ विषयांपैकी चार विषय निवडायचे होते. या विषयानुसार विद्यार्थ्यांनी परीक्षेची तयारी केली; मात्र आता हॉलतिकीट मिळाल्यावर विद्यार्थ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. परीक्षा अर्जात जे विषय विद्यार्थ्यांनी दिले होते, त्याऐवजी दुसऱ्याच विषयाची नोंद हॉल तिकिटावर आहे. त्यामुळे आता नेमकी कोणत्या विषयाची परीक्षा द्यायची, असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. परीक्षा अर्ज महाविद्यालयामार्फत विद्यार्थी भरत असतो, काही जर दुरुस्ती असतील तर विद्यार्थ्यांनी महाविद्यालयामार्फत विद्यापीठाशी संपर्क साधावा, दुरुस्ती करण्यात येईल, असे विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com