तंबाखू सारख्या पदार्थांपासून आणि व्यसनांपासून दूर रहावे - सह आयुक्त मिलिन सावंत, | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तंबाखू सारख्या पदार्थांपासून आणि व्यसनांपासून दूर रहावे - सह आयुक्त मिलिन सावंत,
तंबाखू सारख्या पदार्थांपासून आणि व्यसनांपासून दूर रहावे - सह आयुक्त मिलिन सावंत,

तंबाखू सारख्या पदार्थांपासून आणि व्यसनांपासून दूर रहावे - सह आयुक्त मिलिन सावंत,

sakal_logo
By

कर्मचाऱ्यांना तंबाखूमुक्तीची शपथ
व्यसनांपासून स्वतःसह इतरांनाही दूर ठेवा ः मिलन सावंत
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ ः समाजाचे घटक म्हणून आपण सर्वांनीच व्यसनासारख्या समस्येकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. वाढती व्यसनाधीनता समाजासाठी अत्यंत गंभीर बाब आहे. विविध कार्यक्रमांच्या आयोजनातून नागरिकांमध्ये व्यसनांबाबत जाणीव-जागृती होणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. आपण व्यसनांपासून दूर राहण्यासह इतरांनाही त्यापासून परावृत्त करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे आवाहन महापालिकेचे सह आयुक्त (सामान्य प्रशासन) मिलिन सावंत यांनी केले.
जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त महापालिका मुख्यालयात पोस्टर प्रदर्शनासह आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमामध्ये सावंत बोलत होते. आरोग्याला घातक असलेल्या तंबाखूसारख्या पदार्थांपासून आणि इतर व्यसनांपासून मुंबईकरांनी दूर राहावे व इतरांनाही व्यसनांच्या घातक परिणामाबाबत सांगावे, असेही ते म्हणाले.
तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे दरवर्षी भारतात तब्बल १३ लाख नागरिक मृत्युमुखी पडत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालातून पुढे आले आहे. त्यासंदर्भात समाजात जनजागृती होणे आवश्यक आहे. त्याच उद्देशाने मंगळवारी (ता. ३०) ‘जागतिक तंबाखू विरोधी दिना’च्या औचित्याने महापालिका सार्वजनिक आरोग्य विभाग, कामगार विभाग आणि महाराष्ट्र राज्याचे नशाबंदी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यालयातील उपाहारगृहामध्ये पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. बुधवारी (ता. ३१) असलेल्या ‘जागतिक तंबाखू विरोधी दिना’निमित्ताने जागतिक आरोग्य संघटनेच्या यंदाच्या वर्षीसाठी निर्धारित करण्यात आलेल्या संकल्पनेनुसार ‘आपल्याला अन्न हवे आहे, तंबाखू नाही’ या विषयाला अनुसरून पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

अधिकारी-कर्मचाऱ्यांना शपथ
पोस्टर प्रदर्शनासह सहआयुक्त (सामान्य प्रशासन) मिलिन सावंत यांच्या उपस्थितीत महापालिका अधिकारी, कर्मचारी आणि मुंबईकरांना व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली. या वेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करून व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन केले. कार्यक्रमादरम्यान, कर्मचारी वर्गाला तंबाखूचे दुष्परिणाम सांगणारी पत्रकेही वाटण्यात आली. या वेळी महापालिकेचे प्रमुख कामगार अधिकारी (प्रभारी) सुनील जांगळे, नशाबंदी मंडळाचे चिटणीस अमोल स. भा. मडामे, नशाबंदी मंडळ कार्यक्रम समन्वयक मिलिंद पाटील इत्यादींसह महापालिकेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.