आपत्कालीन प्रसंगांच्या पार्श्वभूमीवर रेकी

आपत्कालीन प्रसंगांच्या पार्श्वभूमीवर रेकी

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ ः मुंबईतील दरडप्रवण क्षेत्राचे तसेच मोडकळीस आलेल्या जीर्ण इमारतींच्या परिसरात आपत्कालीन प्रसंगी विविध यंत्रणेच्या सज्जतेसाठीची रेकी पुढील आठवड्यात करण्यात येणार आहे. अतिशय आव्हानात्मक ठिकाणी मदतकार्य पोहचवण्यासाठी सुसज्जतेची खात्री करणे हा रेकी करण्याचा उद्देश असणार आहे. एखाद्या घटनेआधीची विविध यंत्रणांच्या समन्वयाची चाचपणीची तयारी करणे हा प्रयत्न देखील यामागे आहे. महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षामार्फत विविध यंत्रणांची पावसाळापुर्व तयारीची बैठक आज (ता.१) पालिका मुख्यालयात पार पडली. यावेळी सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश प्रशासनामार्फत देण्यात आले.

मुंबईतील पावसाळ्याच्या काळातील विविध यंत्रणांच्या सज्जतेसाठीचे निर्देश महापालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी दिले आहेत. आपत्कालीन प्रसंगी मदतीसाठी सर्व यंत्रणांनी योग्य माहिती उपलब्ध करून द्यावी. ज्यामुळे मदतकार्य पोहोचवण्यासाठी पालिकेच्या आपत्कालीन कक्षाला सोयीचे होईल, अशा सूचना सहआयुक्त (सामान्य प्रशासन) मिलिन सावंत यांनी विविध यंत्रणांच्या प्रतिनिधींना दिल्या. त्यासोबतच विविध यंत्रणांच्या नियंत्रण कक्षाच्या हेल्पलाईन कार्यरत आहेत का याची खातरजमा करण्याचे आवाहन आपत्कालीन नियंत्रण कक्षाचे संचालक महेश नार्वेकर यांनी केले.

या बैठकीला पालिकेच्या विविध विभागांसह बेस्ट, एमएमआरडीए, भारतीय हवामान, राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक, तटरक्षक दल, भारतीय नौदल, विमानतळ प्राधिकरण, अदाणी इलेक्ट्रिसिटी आदी, विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या समन्वयातून चाचपणीसाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक (एनडीआरएफ), मुंबई अग्निशमन दल, भारतीय नौदल, मुंबई वाहतूक पोलिस या यंत्रणा या रेकीमध्ये सहभाग घेणार आहेत.
..................
१५ दरडप्रवण क्षेत्रे
महापालिका क्षेत्रात सुमारे १५ दरडप्रवण क्षेत्रांचा समावेश आहे. याठिकाणी पावसाळ्याच्या कालावधीत धोका उद्भवू शकतो. त्यामुळेच यंदाच्या पावसाळ्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कक्षाने राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाला अतिरिक्त दोन तुकड्या तैनात ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. घाटकोपर आणि कुर्ला या ठिकाणच्या दरडप्रवण क्षेत्रात या अतिरिक्त तुकड्या सज्ज असणार आहेत. या दरडप्रवण क्षेत्रात मदतकार्य पोहचवण्यासाठी देखील रेकी करण्यात येणार आहे. त्यासोबतच मुंबईतील जीर्ण आणि धोकादायक स्थितीतील इमारतींच्या ठिकाणी बचाव आणि मदतकार्य पोहोचवण्यासाठी देखील रेकी करण्यात येईल.
........................

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com