राणेंची सभा उधळल्याप्रकरणी १८ वर्षांनी आरोप निश्चिती

राणेंची सभा उधळल्याप्रकरणी १८ वर्षांनी आरोप निश्चिती

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ६ : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी २००५ मध्ये शिवसेना सोडल्यानंतर ‘सामना’ कार्यालयाबाहेर झालेल्या सभेतील गोंधळाप्रकरणी आज मुंबई सत्र न्यायालयाने आमदार अनिल परब यांच्यासह शिवसेना, मनसे आणि ठाकरे गटाच्या आजी-माजी ३८ लोकप्रतिनिधी-कार्यकर्त्यांवर तब्बल १८ वर्षांनी आरोप निश्चित केले आहेत. या निमित्ताने न्यायालयात हजेरी लावलेल्या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकमुखाने आरोप अमान्य केले.

राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर २००५ मध्ये सामनाच्या कार्यालयाबाहेर सभा घेतली होती; मात्र सभा सुरू असताना त्या वेळी शिवसेनेत असलेल्या अनेक कार्यकर्त्यांनी राडा केला होता. पोलिसांनी या प्रकरणात ४७ जणांवर फौजदारी तक्रार दाखल करत न्यायालयात आरोपपत्रही दाखल केले. आज न्या. राहुल रोकडे यांच्या न्यायालयात सर्वांनी दोषारोप निश्चित करण्यासाठी हजेरी लावली. प्रत्येकानेच स्वतःवरील आरोप अमान्य केल्यानंतर ‘चला, याबाबत तरी तुमच्यात एकमत आहे’, अशी मिश्किल टिप्पणी न्यायालयाने केली.

यावर सर्वांनीच हसून दाद दिली. सभा उधळल्याप्रकरणी ३८ आरोपींवर दोषारोप निश्चित झाले. यामध्ये आमदार-खासदारांचा समावेश आहे. दादर पोलिस ठाण्यात ४७ जणांवर एकूण ५ गुन्हे दाखल केले आहेत. यापैकी ५ आरोपींचा मृत्यू झाला आहे.

बोलणे टाळले...
शिवसेना ठाकरे गटाचे परब, शिंदे गटाचे यशवंत जाधव यांच्यामध्ये बोलणे सुरू होते; तर किरण पावसकर आणि विशाखा राऊत असे अनेक जण एकमेकांशी बोलत होते; मात्र परब आणि पावसकर यांनी एकमेकांशी बोलणे टाळल्याचे दिसले. ज्येष्ठ शिवसैनिक दगडू सकपाळ यांनीही न्यायालयात आज हजेरी लावली होती.

न्यायालयात हजेरी
१) संजय बावके, रवींद्र चव्हाण, हरिश्चंद्र सोलकर आणि श्रीधर सावंत हे चार आरोपी आज उपस्थित राहू शकले नाहीत. गैरहजर राहिलेल्या बावके, चव्हाण आणि सोलकर या तिघांविरोधात न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. श्रीधर सावंत हे रुग्णालयात दाखल असून त्यांना न्यायालयाकडून अवधी देण्यात आला आहे.
२) तीन आरोपींचा तपास लागलेला नाही. याची माहिती पोलिसांकडेही उपलब्ध नाही. त्यामुळे न्यायालयाने या तिघांव्यतिरिक्त अन्य ३८ जणांवर दोषारोप निश्चित केले. या सर्वांवर विविध कलमांतर्गत गोंधळ घालणे, अशांतता करणे आदी आरोप निश्चित करण्यात आले आहेत. आरोप निश्चित झाल्यानंतर आता नियमित खटल्याची कारवाई सुरू होऊ शकेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com