
मुंबईकरांनो काळजी घ्या!
मुंबईकरांनो, काळजी घ्या!
मे महिन्यात ६,५७८ ठिकाणी डेंगी; ७५० ठिकाणी मलेरियाचे डास आढळले
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत; मात्र ऐन उन्हाळ्यात म्हणजेच मे महिन्यात ६,५७८ ठिकाणी डेंगीचा फैलाव करणारे एडिस; तर ७५० ठिकाणी मलेरियाचा फैलाव करणारे डास आढळले आहेत. पालिकेच्या कीटकनाशक विभागाने घरोघरी जाऊन केलेल्या तपासणीतून ही माहिती समोर आली आहे. जानेवारी ते मे महिन्यापर्यंत केलेल्या तपासणीत मे महिन्यात सर्वाधिक मलेरिया व डेंगीचा फैलाव करणारे डास आढळले आहेत.
पावसाळ्यात हलक्या सरी बरसल्यानंतर मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचते; तर पावसाळ्यात साथीच्या आजारांचा फैलाव होण्याचा धोका अधिक असतो. पावसाळ्यात सर्वात मोठे आव्हान ठरणारे साथीचे आजार रोखण्यासाठी पालिकेने आरोग्य यंत्रणा तैनात ठेवली आहे. यामध्ये साथ आजारांच्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांसह उपनगरीय रुग्णालयांत तीन हजारांवर बेड तैनात करण्यात आले आहे. शिवाय मुंबईकरांनीही खबरदारी घ्यावी, स्वच्छता राखावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. घराशेजारील परिसरात असणारे टायर्स, नारळाच्या करवंट्या, फोडलेली शहाळी, थर्माकोल, पत्रे, घरावर टाकलेले प्लास्टिक, पाण्याच्या बाटल्या, पाण्याचे पिंप, मनी प्लांट यांसारख्या शोभेच्या झाडांसाठी ठेवण्यात येणारे पाणी, काचेची किंवा धातूची कासवाची मूर्ती ठेवण्यासाठी वापरण्यात येणारे पाणी जास्त दिवस साचून राहिल्यास त्यात डेंगी, मलेरियाची उत्पत्तिस्थाने तयार होत असतात. त्यामुळे या ठिकाणी पाणी साचू देऊ नये, निरुपयोगी वस्तू नष्ट कराव्यात, असे आवाहन पालिकेने केले आहे.
जानेवारीपासून अशी झाली कार्यवाही
पालिकेने केलेल्या कारवाईत जानेवारीमध्ये मलेरिया पसरवणाऱ्या एनोफिलीस डासाची २३५ ठिकाणे आढळली होती; तर फेब्रुवारीमध्ये २२६, मार्चमध्ये ३८४, एप्रिलमध्ये ५२४; तर फक्त एका मे महिन्यात ७५० ठिकाणी मलेरिया पसरवणारा एनोफिलीस डास आढळला आहे. डेंगी पसरवणारा एडिस डास जानेवारीत ३,२४३ ठिकाणी, फेब्रुवारीत २,७३० ठिकाणी, मार्चमध्ये ४,७४६ ठिकाणी, एप्रिलमध्ये ४,६४८ ठिकाणी आढळला आहे; तर फक्त मे महिन्यात तब्बल ६,५७८ ठिकाणी डेंगी पसरवणारा एडिस डास आढळला आहे. जानेवारीपासून मेअखेरपर्यंत एकूण २,१३७ ठिकाणी एनोफिलीस; तर २१,९४५ ठिकाणी एडिस अशा एकूण २४ हजार ८२ ठिकाणी मलेरिया, डेंगीची उत्पत्ती ठिकाणे आढळली असून ती पालिकेने नष्ट केली आहेत; तर तपासणीनंतर २,८४० जणांना नोटीस बजावली असून बेजबाबदार ६७ जणांविरोधात न्यायालयीन कार्यवाही सुरू आहे.
असा पसरतो डेंगी, मलेरिया
दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रो, टायफाइड, कॉलरा, जाँडीस असे आजार होतात; तर कीटकांच्या प्रभावामुळे मलेरिया, डेंगी, चिकनगुनिया असे आजार पसरतात. या पार्श्वभूमीवर पालिकेकडून मुंबईभरात घरोघरी, आस्थापनांच्या ठिकाणी भेटी देऊन डास उत्पत्तीची ठिकाणे शोधून ती नष्ट केली जातात.
आजार महिना ठिकाणे
मलेरिया जानेवारी २३५
फेब्रुवारी २२६
मार्च ३८४
एप्रिल ५२४
मे ७५०
डेंगी जानेवारी ३२४३
फेब्रुवारीत २७३०
मार्च ४७४६
एप्रिल ४६४८
मे ६५७८