
एमएचटी सीईटीचा १२ जूनला निकाल
मुंबई, ता. ९ : राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष पदवी प्रवेशासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षमार्फत (सीईटी सेल) घेण्यात आलेल्या एमएचटी सीईटी परिक्षेचा निकाल १२ जून रोजी सकाळी ११ वाजता जाहीर होणार आहे. या निकालानंतर राज्यातील एमएचटी-सीईटीच्या कक्षेतील सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याची माहितीही सीइटी सेलकडून आज देण्यात आली. यासोबतच सीईटी कक्षामार्फत बी. एस्सी नर्सिंग-सीईटी प्रवेश परीक्षा प्रथमच घेतली जात आहे. ११ जून रोजी ही परीक्षा होईल. या परीक्षेसाठी ३१ हजार ३८० विद्यार्थ्यांनी अर्ज भरलेले असून महाराष्ट्रतील ७५ परीक्षा केंद्रावर होणार असल्याची माहितीही आज देण्यात आली. दरम्यान व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेसंबंधी मार्गदर्शन, पालक तसेच उमेदवारांच्या समस्या व शंकांचे निरसन करण्यासाठी प्रादेशिक संवाद कार्यक्रम राबवण्यात येणार असल्याचेही सीईटी सेलने म्हटले आहे.