पालिका रुग्णालयांची उंदीरमुक्‍ती

पालिका रुग्णालयांची उंदीरमुक्‍ती

पालिका रुग्णालयांची उंदीरमुक्‍ती
कीटकनाशक विभाग राबवणार विशेष मोहीम

भाग्‍यश्री भुवड ः सकाळ वृत्तसेवा
उंदरांमुळे होणारे नुकसान व पसरणारे आजार यांना पायबंध बसावा, यासाठी उंदरांचा नायनाट करणे, हा एकमेव पर्याय सध्या समोर आहे. विशेष करून रुग्‍णालयांमध्ये उंदरांमुळे रुग्‍णांच्या आरोग्‍याला अधिक धोका असल्‍याने पालिका प्रशासनाने अधिक सतर्कतने रुग्‍णालयांतून उंदरांचा नायनाट करण्याची मोहीम हाती घेतली आहे.

पालिका रुग्णालय आणि परिसरातून लवकरच उंदरांचा नायनाट केला जाणार आहे. पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रुग्णालयाला भेट दिली असता त्यांना रुग्णालयाच्या आवारात उंदीर दिसला, रुग्ण, वैद्यकीय विद्यार्थी आणि रुग्णालयात येणारे डॉक्टर यांचे आरोग्य लक्षात घेऊन अधिकाऱ्याने कीटकनाशक विभागाला उंदरांचा नायनाट करण्याचे निर्देश दिले आहेत. अशा स्थितीत कीटकनाशक विभागाने आता उंदरांचा नायनाट करण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली आहे.
उंदरांच्या कुरतडण्यामुळे आणि चावण्यामुळे केवळ मालमत्तेचे आणि वनस्पतींचे नुकसान होत नाही, तर अनेक रोग पसरतात. उंदीर चावल्याने तापासह इतर संसर्गजन्य रोग होतात. याशिवाय उंदरांच्या मलमूत्राच्या संपर्कात आल्याने लेप्टोस्पायरोसिसचा आजार होण्याचा धोका असतो आणि अनेक वेळा बाधित व्यक्तीचा त्यात मृत्यूही होतो, त्‍यामुळे हा रुग्‍णालय परिसर उंदीरमुक्‍त करण्याचा निर्धार पालिकेने केला आहे. मुंबईत अशा अनेक घटना समोर आल्या आहेत ज्यात पालिका रुग्णालयात आढळणाऱ्या उंदरांमुळे रुग्णांना आपला जीव गमवावा लागला.

अधिकारी वर्गाला सूचना
सध्या पालिका आयुक्त ते अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्त रुग्णालयांना भेटी देत आहेत. दरम्यान, एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, रुग्णालयाच्या तपासणीदरम्यान, परिसरात उंदीर दिसून आले. उंदीर रोग पसरवू शकतात, हे लक्षात घेऊन कीटकनाशक विभागाच्या अधिकाऱ्यांना पालिका रुग्णालयातील उंदरांचा नायनाट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. अधिकाऱ्यांच्या सूचनेनंतर कीटकनाशक विभागाने कंबर कसली असून, रुग्णालयांतील उंदीर निर्मूलनासाठी विशेष मोहीमही सुरू केली आहे.

वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेनुसार आम्ही विशेष मोहिमेचा एक भाग म्हणून पालिका रुग्णालयांमधील सापडणाऱ्या उंदरांचा नायनाट प्रक्रिया सुरू केली आहे.
- चेतन चौबल, कीटकनाशक विभागप्रमुख, पालिका

१० संस्था, ५० रुग्णालये
कीटकनाशक विभागाकडे उंदीर मारण्यासाठी एकूण १० संस्था आहेत. सध्या या १० संस्था १७ वॉर्डमध्ये कार्यरत आहेत, परंतु या सर्व २४ वॉर्डांमध्ये असलेल्या रुग्णालयांमध्ये उंदीर मारण्याचे काम करणार आहेत. मुंबईतील चार वैद्यकीय महाविद्यालये, १८ उपनगरीय रुग्णालये आणि २९ प्रसूतिगृहांमध्ये उंदीर मारण्याची मोहीम राबवण्यात येणार आहे.

अशी राबवणार मोहीम
कीटकनाशक विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, नाल्यांमध्ये किंवा परिसराबाहेर अनेकदा दिसणारे मोठे उंदीर मारण्यासाठी पालिकेने नियुक्त केलेल्या संस्थेच्या नाईट रॅट किलरला उंदीर नष्ट करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.  यासह, पॉयझन (जे खाल्ल्यानंतर उंदीर मरतात) हे ठेवण्यासदेखील सांगितले आहे. रुग्णालयाच्या आत उंदरांसाठी पिंजऱ्यांव्यतिरिक्त, रुग्णालय प्रशासनाला उंदरांची उगमस्थाने बंद करण्यास पावले उचलण्यास सांगितले आहे.

एका उंदरामागे २३ रुपये
पालिका सध्या रॅट किलर्सना उंदीर मारण्यासाठी २३ रुपये देते; मात्र त्यांना हे पैसे पालिकेने संपूर्ण महिन्यासाठी दिलेले टार्गेट पूर्ण केल्यावर मिळतात, जर हे टार्गेट ५० पेक्षा कमी असेल, तर एक रुपयाही दिला जात नाही. जर १०० उंदीर मारण्याचे लक्ष्य दिले गेले असेल आणि संस्थेला फक्त ७० उंदीर मारता आले, तर ११ रुपयांच्या हिशेबाने पैसे दिले जातात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com