यंदा शाडूच्या गणेशमूर्तींची कार्यशाळेत लगबग!

यंदा शाडूच्या गणेशमूर्तींची कार्यशाळेत लगबग!

मुंबई, ता. ८ : गणेशोत्सव अडीच महिन्यांवर आला असून मूर्तिशाळेत लगबग सुरू झाली आहे. यंदाच्या वर्षी घरगुती मूर्ती शाडूमातीच्या बनवणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे शाडूच्या गणेशमूर्ती बनवण्याकडे मूर्तिकारांचा कल अधिक दिसत आहे. गिरगाव, लालबाग, परळ इत्यादी भागांतील मूर्ती कारखान्यांत गणेशभक्तांची मागणी नोंदवण्यासाठी वर्दळ वाढली आहे.

पूर्वी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्तींना अधिक मागणी होती. प्रशासनाने पीओपीच्या गणेशमूर्तींवर बंदी घातल्याने पुन्हा शाडूच्या मूर्तींना मागणी वाढली आहे. लालबागमधील मूर्तिकार अनंत पंगाल यांनी सांगितले, की आम्ही शाडूच्याच मूर्ती बनवतो; मात्र पीओपीचे प्रमाण वाढू लागल्याने आमच्या व्यवसायावर विपरीत परिणाम झाला. खरेदीच होत नसल्याने ऑर्डर आल्यावरच आम्ही शाडूच्या मूर्ती बनवू लागलो. काही वेळा तयार मूर्ती आणून त्यांची विक्री करू लागलो. यंदापासून घरगुती गणेशमूर्ती शाडूची बनवणे बंधनकारक केल्याने आमच्या व्यवसायाला पुन्हा सुगीचे दिवस येतील, अशी आशा आहे.

शाडूची मूर्ती बनवण्यासाठी आणि त्या सुकवण्यासाठी तुलनेने अधिक वेळ लागतो. अशा मूर्ती महागही असतात; मात्र यंदाच्या वर्षी शाडूच्या मूर्तींना मागणी वाढणार असल्याची आशा व्यक्त करण्यात येत आहे. घरगुती मागणी लक्षात घेऊन बहुतांश मूर्तिकार दोन ते अडीच फुटांची मूर्ती घडवण्याकडे अधिक लक्ष देत आहेत. त्याशिवाय अगदी एक फुटापासून अडीच ते तीन फुटी मूर्तीही घडवणे सुरू आहे.

अलीकडे वेगवेगळ्या भावमुद्रांतील गणेशमूर्ती घडवण्याकडे अधिक कल असल्याचे दिसत होते. मात्र, पुन्हा एकदा शास्त्रोक्त गणपती आणि पौराणिक पद्धतीच्या मूर्तींना मागणी वाढली आहे. गेल्या वर्षी मुंबईत साधारण ४० टक्के गणेशभक्तांनी शाडूच्या मूर्तींना पसंती दिली होती. यंदा त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता असून आकडा ६० टक्क्यांच्या वर जाईल, असेही मूर्तिकार सांगत आहेत. मात्र, प्रशासनाने बाहेरून येणाऱ्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती रोखणे आवश्यक असल्याचे बृहन्मुंबई गणेश मूर्तिकार संघाचे अध्यक्ष गजानन तोंडवळकर यांनी सांगितले.

पाचशे रुपयांची वाढ
यंदा शाडूच्या मूर्तींच्या किमती साधारण ८ ते १० टक्क्यांनी वाढल्या आहेत. दोन फुटांच्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीची किंमत साधारण दोन हजार; तर शाडूची मूर्ती चार हजारांना विकली जात होती. त्यात साधारण पाचशे रुपयांची वाढ झाली आहे. माती, रंग आणि कारागिरांची मजुरी वाढल्याने भाववाढ झाल्याचे मूर्तिकार सांगतात. त्यावरून काही ग्राहक प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीबाबत विचारणा करतात. मात्र, बहुतांश गणेशभक्त शाडूच्या मूर्तींची बुकिंग करत असून त्यांच्यातही जागृती आली आहे, असे गजानन तोंडवळकर यांनी सांगितले.
.......................

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com