मुंबईकरांनो सावधान लेप्टो बळावतोय!

मुंबईकरांनो सावधान लेप्टो बळावतोय!

Published on

मुंबईकरांनो सावधान, लेप्टो बळावतोय!
एका आठवड्यात अडीचशे टक्क्यांनी वाढ
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : मुंबईत सध्या पावसाचा जोर वाढला आहे; मात्र मध्यंतरी संथ झालेल्या पावसाच्या वेगामुळे मुंबईत आता पावसाळी आजारांचा संसर्ग वाढला आहे. विशेष करून लेप्टोचा धोका वाढला असून लेप्टो रुग्णांची संख्या १०४ वर पोहोचली आहे. मुंबईत या वेळेस पावसापूर्वीच लेप्टोचे रुग्ण सापडायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आधीच पालिका चिंतेत असून पालिकेच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून दिलेल्या माहितीनुसार लेप्टोच्या रुग्णांमध्ये एका आठवड्यात अडीचशे टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात २९ लेप्टो रुग्ण सापडत होते; मात्र या आठवड्यात १०४ रुग्ण सापडले आहेत; तर जून महिन्यात ९७ रुग्ण सापडले होते.
डेंगी, लेप्टोसह इतर पावसाळी आजारांत २० ते ३० टक्के वाढ झाल्याचे समोर येत आहे. त्यामुळे मुंबईला साथीच्या आजारांचा विळखा पडला असून १६ दिवसांत मलेरिया ३५५, डेंगीचे २६४ रुग्ण आणि गॅस्ट्रो रुग्णसंख्या हजारांच्या घरात पोहचली आहे. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांचा झपाट्याने फैलाव होत असून १ ते १६ जुलैपर्यंत मलेरियाचे ३५५, डेंगीचे २६४; तर लेप्टोचे १०४ रुण आढळले आहेत; तर गॅस्ट्रोचे ९३२ रुग्णांमध्ये निदान झाले आहे.
दरम्यान, २३ जून रोजी नायर रुग्णालयात ३८ वर्षीय महिलेचा लेप्टोची लागण होऊन मृत्यू झाला होता. १६ दिवसांत डेंगी २६४, मलेरिया ३५५; तर गॅस्ट्रोचे तब्बल ९३२ रुग्ण आढळले होते. ही वाढ कायम असून गॅस्ट्रो, मलेरिया, डेंगी, रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, साथीच्या आजारांचे निदान झालेल्या बहुतेक रुग्णांना बाह्य रुग्ण विभागामार्फत उपचार दिले जात असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

१ ते १६ जुलैपर्यंत रुग्णांचे निदान
मलेरिया - ३५५
डेंगी - २६४
गॅस्ट्रो - ९३२
लेप्टो - १०४
कावीळ - ७६
स्वाईन फ्ल्यू - ५२
चिकनगुनिया - १०
.........
केईएममध्ये मान्सून वॉर्ड
केईएममध्ये नुकताच मान्सून वॉर्ड सक्रिय करण्यात आला आहे. व्यसनमुक्तीचा हा वॉर्ड होता; मात्र आता इथे पावसाळी आजारांनी ग्रस्त रुग्णांवर उपचार केले जातील, त्यासाठी ४० बेड्सची सोय करण्यात आली आहे. आता सध्या फक्त २ गॅस्ट्रोचे आणि काही तापाचे रुग्ण तिथे दाखल असल्याचे केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.