अवजड वाहनांची ‘लेन कटिंग’ त्रासदायक

अवजड वाहनांची ‘लेन कटिंग’ त्रासदायक

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २१ : ‘‘एकवेळ बॉलीवूडमध्ये जुनी गाणी रिमिक्स करून वापरणे थांबेल; पण महामार्गांवर ट्रकचालक उजव्या ‘लेन’मधून जाऊन वाहतूककोंडी करणे थांबवणार नाहीत,’’ अशा आशयाचे ट्विट करून संगीत दिग्दर्शक सलील कुलकर्णी यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने राज्यात सर्वत्र जाणे होते. रात्री-अपरात्री प्रवास करावा लागतो, तेव्हा हा वाईट अनुभव येतो. नितीन गडकरी यांनी सुंदर रस्ते बनवले, आता वाहनचालकांनीही वाहतूक नियमांची ‘स्वयम् शिस्त’ पाळण्याची गरज कुलकर्णी यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली आहे.

ट्रकचालकांना डाव्या बाजूच्या तिसऱ्या लेनमधूनच वाहन चालवण्याची परवानगी आहे; मात्र ट्रकचालक पहिल्या किंवा दुसऱ्या लेनमधून वाहन चालवतात. हे ट्रक अचानक नादुरुस्त किंवा बंद झाल्यास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. त्यामुळे मुळातच वाहतुकीच्या नियमांचे धडे शालेय जीवनापासून सुरू करण्याची गरज असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले. नाशिकला जिथे सहा तास लागायचे तिथे आता तीन ते साडेतीन तासांत पोहोचता येते. त्यामुळे जसे रस्ते चांगले झाले तसेच चालकांनीही वाहतूक नियमांचे धडे घेण्याची गरज आहे. वाहतूक नियमांच्या उल्लंघनाचे अनुभव मलाच आले असे नाही; तर यापूर्वी ऋषिकेश रानडे, सुबोध भावे, संदीप खरे अशा अनेकांनी वेळोवेळी यावर भाष्य केल्याचेही कुलकर्णी यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

शौचालयांच्या वापराचेही धडे आवश्यक
शालेय शिक्षणापासूनच वाहतूक नियमांचा एखादा धडा असायला पाहिजे. यामध्ये फक्त वाहतूकच नाही तर शौचालयांचा योग्य वापर करणे किंवा यांसारख्या अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यांची शिकवण शालेय जीवनापासूनच मिळाल्यास चुकीच्या गोष्टी होणार नाहीत. वाहतुकीच्या नियमांचे शिक्षण अवजड वाहनचालकांना पद्धतशीर देणे गरजेचे आहे. राज्यात सर्व दिशेने प्रवास करतो, आठवड्यातून एकदा मुंबई, कोल्हापूर, नाशिक, सातारा, सांगली, सोलापूर जाणे होतेच. त्यामुळे वाहतूक नियमांच्या उल्लंघनाचा अनुभव अधिक खात्रीने सांगू शकतो, असेही कुलकर्णी म्हणाले.

नितीन गडकरी यांनी राज्यातील रस्ते खूप चांगले केले आहेत. त्यामुळे प्रवास करताना मनोमनी आम्ही रस्ते चांगले केल्याबद्दल गडकरींचे धन्यवादसुद्धा मानत असतो. नियम मोडणाऱ्यांवर किरकोळ कारवाई करून काही होणार नाही. त्यासाठी लोकशिक्षण आणि शालेय जीवनापासूनच वाहतूक नियमांचे धडे देणे गरजेचे आहे.
- सलील कुलकर्णी, संगीत दिग्दर्शक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com