

पवईतील नवीन प्रकल्पांना स्थानिकांचा विरोध
सिटिझन फोरमची स्थापना; प्रदूषणाने रहिवासी त्रस्त
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ : पवई परिसर हा निसर्गरम्य आणि शांत परिसर म्हणून ओळखला जातो; मात्र येथील नवीन प्रकल्पांमुळे रहिवाशांची झोप उडाली आहे. हवा तसेच ध्वनिप्रदूषणामुळे स्थानिक हैराण झाले आहेत. याविरोधात त्यांनी ‘सिटिझन फोरम’ची स्थापना केली असून, होऊ घातलेल्या प्रकल्पांना आपला विरोध दर्शवला आहे.
हिरानंदानी गार्डन्स आणि त्याच्या शेजारी असणारे सेंट्रल अव्हेन्यू आणि टेक्नॉलॉजी स्ट्रीटवर व्यावसायिक कार्यालये असलेले निवासी संकुल हा मुंबईतील सर्वोत्तम नियोजित हरित परिसर म्हणून ओळखला जात होता; मात्र एसईझेडच्या अंतर्गत चार मोठ्या बीपीओ कॉम्प्लेक्सची उभारणी झाल्यानंतर वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे हिरानंदानी गार्डन्स अत्यंत गजबजलेले क्षेत्र बनले आहे. यामुळे या भागातील प्रदूषणाची पातळी वाढली असल्याचे रहिवाशांचे मत आहे. त्यातच नवीन प्रकल्पांमुळे यात वाढ होण्याची भीती रहिवाशांना सतावत आहे.
काय आहे समस्या?
पवई येथे एका मोठ्या बांधकाम व्यावसायिकाने येथील मालमत्ता ताब्यात घेतली असून, तेथे आता टोलेजंग टॉवर उभारला जात आहे. यामुळे मध्यरात्री दीडपर्यंत वाहतूक कोंडी आणि कर्कश हॉर्न सुरू असतात. याचा त्रास रहिवाशांना सहन करावा लागत आहे. सोबत या कामामुळे प्रदूषणात भर पडत असल्याचे स्थानिकांनी सांगितले.
असा आहे प्रकल्प
रहिवासी रतन शारदा यांनी दिलेल्या माहितीनुसार येथील सेंट्रल अव्हेन्यूवरील सिटीपार्क व्यावसायिक इमारत पाडली जाईल आणि त्या ठिकाणी १८ मजली टॉवर उभारले जाईल. त्यात फूड मॉल, व्यावसायिक कार्यालये आणि शोरूम असतील. यात हजार कारसाठी पार्किंगची व्यवस्था आहे; परंतु दुचाकी वाहनांसाठी पार्किंग नाही. उपलब्ध माहितीनुसार हा प्रकल्प नोव्हेंबरच्या अखेरीस सुरू होणार आहे. या प्रकल्पाला हरित लवादाची मंजुरी मिळाली असून महापालिकेची परवानगी मिळालेली नाही, असे रहिवाशांनी सांगितले.
ईडन क्रॉसिंग एरिया हा आधीच मोठा वाहतूक कोंडी होणारा परिसर आहे. १ हजार कार आणि निदान १० हजार दुचाकी दिवसातून किमान पाचसहा वेळा मल्टिप्लेक्स आणि रिटेल आऊटलेट्समध्ये आत-बाहेर जाण्याची शक्यता आहे. याचा सर्वाधिक त्रास स्थानिक रहिवाशांना होणार असून हिरानंदानी गार्डन्समध्ये येणे अशक्य होणार आहे. शिवाय यामुळे ध्वनी आणि वायुप्रदूषण वाढण्याची भीतीदेखील आहे.
- के. रामक्रिष्णन, रहिवासी
स्थानिक रहिवाशांनी एकत्र येऊन ‘सिटिझन फोरम’ची स्थापना केली असून त्या माध्यामतून लोकांसाठी खुला मंच उपलब्ध करून दिला आहे. या मंचाच्या माध्यमातून रविवारी संबंधित समस्येवर चर्चा केली गेली. यात सहभागी झालेल्या लोकांनी येथे येऊ घातलेल्या नवीन प्रकल्पांबाबत चिंता व्यक्त केली. अनेकांनी भविष्यातील हवा आणि आवाजाच्या प्रदूषणाकडेही लक्ष वेधले. यासाठी सर्वांनी एकत्र येऊन याविरोधात आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.
- देबी गोयंका, पर्यावरणतज्ज्ञ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.