कामगार क्रीडा भवन कात टाकतयं:

कामगार क्रीडा भवन कात टाकतयं:
Published on

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : कामगारांच्या चळवळीचा साक्षीदार राहिलेले ऐतिहासिक कामगार मैदान आता कात टाकत आहे. या मैदानावर पारंपरिक मैदानी खेळासोबतच रायफल शूटिंग, आर्चरी, जिन्मॅस्टिक्सची सुविधाही देण्यात आली आहे.
प्रभादेवी येथील कामगार मैदान हे कामगारांच्या चळवळीचे केंद्र मानले जाते. या कामगार क्रीडा भवनाची उभारणी १९७० च्या दशकात करण्यात आली असून ही इमारत ५० वर्षांपेक्षा अधिक जुनी आहे. तत्कालीन राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी यांच्या हस्ते या वास्तूचे उद्‌घाटन करण्यात आले होते. मंडळाचे विद्यमान कल्याण आयुक्त रविराज इळवे यांनी हा पदभार स्वीकारल्यानंतर मंडळाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याचे त्यांच्या लक्षात आले. तेव्हा देणगीदाराच्या मदतीने आणि शासनाच्या इतर विभागांच्या विविध योजनांच्या समन्वयातून या वास्तूचा कायापालट करण्याचे प्रयत्न सुरू केले. सुरुवातीला सनदी लेखापाल रवी गुलगुले यांनी देणगी स्वरूपात भवनातील अभ्यासिकेचे आधुनिकीकरण करून दिले. तसेच या कामगार क्रीडा भवनाची संरक्षक भिंत जीर्ण होऊन काही ठिकाणी पडली होती. मुंबई शहर जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ही भिंत बांधून घेण्यात मंडळ प्रशासनाला प्रथम यश आले.
क्रीडा भवनाच्या शेजारी सुमारे १०-११ वर्षांपूर्वी नव्याने बांधण्यात आलेल्या प्रशासकीय इमारतीच्या तळमजल्यात पावसाचे पाणी साचत होते. समस्या सोडविण्यासाठी भूगर्भशास्त्रज्ञ डॉ. धनंजय येडेकर यांचे मार्गदर्शन घेण्यात आले. तसेच याच तळमजल्यावर आता अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त रायफल शूटिंग रेंज उभी राहिलेली आहे.
मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश केसरकर, कामगार मंत्री सुरेश खाडे, कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनीता वेद सिंगल यांच्या मंडळ प्रशासनाला मिळालेल्या मार्गदर्शनामुळे व पाठबळामुळे हुतात्मा बाबू गेनू कामगार क्रीडा भवन आता नव्या अत्याधुनिक सुविधांसह दिमाखात उभे राहत आहे. मुंबई शहर जिल्ह्याचे तत्कालिन जिल्हाधिकारी राजीव निवतकर आणि विद्यमान जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्या देखील या कामात सहकार्य लाभत आहे.
…..
या आहेत सुविधा
कामगार मैदानात आता १० मीटर रायफल शूटिंग रेंज, ७० मीटर आर्चरी रेंज या सुविधा उपलब्ध आहेत. यात १० मीटर रायफल शूटिंग रेंजमध्ये एकावेळी १५ खेळाडूंना सराव करू शकतात. तसेच १५ मॅन्युअल टार्गेट लेनसह ८ कंप्युटराज्ड टार्गेट सिस्टिम्स या रेंजमध्ये आहेत. तसेच भारतीय आणि परदेशी बनावटीच्या अत्याधुनिक एअर गन येथे उपलब्ध आहेत. तसेच ७० मीटर आर्चरी प्रशिक्षण रेंजदेखील आहे. यात एकाच वेळी २१ खेळाडूंना सराव करण्याची सुविधा आहे. भारतीय व परदेशी बनावटीचे अत्याधुनिक आर्चरी साहित्यदेखील येथे उपलब्ध आहे.
…...
नूतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात
कामगार क्रीडा भवनाचे व तेथील विविध क्रीडा सुविधांचेदेखील आधुनिकीकरण व नूतनीकरण करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. येथे जलतरण तलाव, वुडन बॅडमिंटन कोर्ट, टेबल टेनिस कोर्ट, व्यायामशाळा, अभ्यासिका, ग्रंथालय, शिवण प्रशिक्षण वर्ग, बालवाडी, खुला रंगमंच आदी सुविधा आहेत. तसेच जलतरण तलावाचे आधुनिकीकरण करण्यात येत त्यावर आकर्षक असे टेन्साईल रूफ (छत) बसवून घेण्यात येत आहे. क्रीडा भवनाच्या दुसऱ्या मजल्यावर कलादालन (आर्ट गॅलरी) सुविधा उपलब्ध करून देण्याचाही प्रयत्न आहे.
......................
शासनाच्या विविध विभागांशी समन्वय साधून त्यांच्याकडील योजनांच्या तरतुदींमधून सुविधा तयार करून देण्याची विनंती केली. पालकमंत्री, जिल्हा नियोजन समिती, क्रीडा विभाग तसेच युनिसेफसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांचेदेखील सहकार्य मिळत आहे.
- रविराज इळवे, कामगार कल्याण आयुक्त
......................
जुन्या वाचनालयाचा कायापालट झाला आहे. बैठक व्यवस्थेसह चार्जिंग सुविधा, आवश्यक लाईट्स सुविधेत सुधारणा झाली आहे. याशिवाय वाचनालयाची वेळ वाढवून दिल्याने विद्यार्थ्यांना याचा अधिक फायदा होत आहे.
- राहुल आनंद, एमपीएससी अभ्यासक
.................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com