कर्करोगविरोधातील लढ्यात भारताला मोठे यश

कर्करोगविरोधातील लढ्यात भारताला मोठे यश

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : भारताच्या पहिल्या जनुकीय उपचार प्रणालीची ही सुरुवात कर्करोगाविरुद्धच्या आमच्या लढ्यातील मोठे यश आहे. अत्यंत किफायतशीर दरात उपलब्ध होणारी ही प्रणाली असंख्य कर्करोगग्रस्त रुग्णांना नवजीवन देणारी ठरेल, असा विश्‍वास राष्‍ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्‍यक्त केला.
आयआयटी मुंबई येथे कर्करोगावरील सीएआर-टी सेल म्हणजेच टी पेशीआधारित स्वदेशी उपचार प्रणालीचे गुरुवारी राष्‍ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. आयआयटी मुंबई आणि टाटा मेमोरियल रुग्णालय यांच्या सहकार्याने आणि इम्युनोअॅक्ट या उद्योग क्षेत्रातील भागीदाराच्या सहकार्याने ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला राज्यपाल रमेश बैस, आयआयटी मुंबई या संस्थेचे संचालक प्रा. शुभाशिष गुप्ता, टाटा मेमोरियल सेंटरचे संचालक प्रा. सुदीप गुप्ता, शैक्षणिक तसेच पायाभूत सुविधाविषयक व्यवहार विभागाचे उपसंचालक प्रा. एस. सुदर्शन, वित्त आणि परराष्ट्र व्यवहार विभागाचे उपसंचालक प्रा. के.व्‍ही.के. राव यांच्यासह आयआयटी मुंबईच्या जैवविज्ञान आणि जैवअभियांत्रिकी विभागात कार्यरत असलेले प्रा. राहुल पुरवार तसेच मुंबई येथील टाटा मेमोरियल केंद्राचे कार्यरत डॉ. हसमुख जैन आणि शस्त्रक्रिया विभागतज्ज्ञ डॉ. गौरव नरुला या कार्यक्रमाला उपस्थित होते.
राष्ट्रपती मुर्मू पुढे म्हणाल्या की, विकसित देशांत अनेक वर्षांपासून ही प्रणाली उपलब्ध आहे. मात्र, ती अत्यंत खर्चिक असल्याने जगभरातील बहुतांश रुग्णांच्या आवाक्याबाहेर आहे. त्या तुलनेत नव्‍याने विकसित केलेली ही प्रणाली जगातील सर्वात किफायतशीर असल्याचे सांगितले जात आहे. देशातील शिक्षण क्षेत्र आणि उद्योग क्षेत्र यांच्यातील भागीदारीचे हे उत्कृष्ट उदाहरण असून त्यातून अशा पद्धतीच्या इतर प्रयत्नांना प्रेरणा मिळेल. राज्यपाल रमेश बैस यांनी या अतुलनीय कामगिरीबद्दल आयआयटी मुंबई, टाटा मेमोरियल केंद्र तसेच इम्युनोॲक्ट या संस्थांच्या पथकांचे अभिनंदन केले.
-------
आज आपल्या देशासाठी आणि विशेषत्वाने आयआयटी मुंबई तसेच टाटा मेमोरियल रुग्णालय यांच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. देशातील दोन प्रमुख संस्थांनी एकत्र येऊन वैद्यकीय क्षेत्रातील हा सर्वोत्कृष्ट उपक्रम सुरू केला आहे. काही प्रकारच्या कर्करोगांवर उपचार करण्यात मदत करणाऱ्या नव्या कर्करोग उपचार प्रणालीमुळे कर्करोगग्रस्त रुग्णांना दिलासा मिळणार आहे.
- रमेश बैस, राज्यपाल
------
स्वदेशी पद्धतीने पेशी-आधारित उपचार पद्धती विकसित करू शकणाऱ्या जगातील निवडक देशांत आता भारताचा समावेश झाला आहे, ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. आपल्या देशातील कर्करुग्णांना मदत करण्याच्या उद्देशाने हे लक्ष्य साध्य करण्यासाठी गेल्या दशकभरात अनेक अडचणींवर मात करून एकत्रित अथक काम करणाऱ्या अनेकानेक शास्त्रज्ञांच्या, डॉक्टरांच्या, नर्सच्या तसेच या विषयाशी संबंधित अनेकांच्या प्रयत्नांचा हा पुरावा आहे.
- प्रा. शुभाशिष चौधरी, आयआयटी मुंबई

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com