गेल्या महिनाभरात १६० पक्ष्यंना उन्हाची झळ

गेल्या महिनाभरात १६० पक्ष्यंना उन्हाची झळ

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : माणसांसारखाच उष्माघाताचा पक्ष्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे. मुंबईतीचे होत असलेले काँक्रीटीकरण, वृक्षडीमुळे झाडांची घटणारी संख्या यामुळे पक्ष्यांचा निवारा उद्ध्वस्त झाला आहे. तसेच इमारतीच्या गच्चीवर आणि बाल्कन्यांमध्ये पक्ष्यांच्या घरट्यांमुळे घाण होण्याची कारणे सांगत इमारतीतील नागरिकांकडून ती नष्ट केल्याने पक्ष्यांना उष्माघाताचा जास्त त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या महिनाभरात १६० हून अधिक निपचित पडलेल्या पक्ष्यांना परळ येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील काहींना उपचारानंतर निसर्गाच्या सानिध्यात सोडून देण्यात आले आहे.
शहरातील वाढत्या नागरीकरणामुळे पक्षांचा किलबिलाट कमी झाला आहे. अशात गेल्या काही दिवसांपासून तामपानात मोठी वाढ झाली आहे. त्याचा परिणाम सर्वसामान्यांप्रमाणे पक्ष्यांवरही झाला आहे. वाढत्या उष्णतेमुळे पक्ष्यांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने ते निपचित पडून असल्याचे चित्र मुंबईत अनेक ठिकाणी दिसून येत आहे. त्यातीलच १६० हून अधिक पक्ष्यांवर परळ येथील बैलघोडा पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. यातील अनेकांना उपचारानंतर सोडून देण्यात आले आहे. यात सर्वात जास्त प्रमाण कबूतर, कावळे, घारींचे प्रमाण अधिक आहे, असे रुग्णालयाचे डॉ. मयूर डंगर यांनी सांगितले.
…..
प्रत्येकाने पुढाकार घेणे गरजेचे
उष्माघातामुळे पक्षांच्या शरीरातील पाणी आणि ग्लुकोज कमी होते. त्यामुळे अशक्तपणा आलेले पक्षी झाडाच्या आणि थंडाव्याचा आडोसा शोधतात. तसेच निपचित पडलेल्या पक्ष्यांवर कावळे आणि इतर पक्षी हल्ले करतात. त्यात जबर जखमी झालेल्या अनेक पक्ष्यांना उपचाराअभावी आपले प्राण गमवावे लागतात. तर रुग्णालयात उपचार मिळतात. मात्र, प्रत्येकाने पर्यावरण रक्षणासाठी सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे डॉ. मयूर डंगर यांनी सांगितले.
-------------------------------------------------------------
उष्माघातापासून पक्ष्यांचा बचाव करण्यासाठी नागरिकांनी आपल्या इमारतींच्या गच्चीवर, मोकळ्या पॅसेजमध्ये आणि झाडांजवळ पाणी ठेवा. विकास करा, मात्र पर्यावरणाचा कमीत कमी ऱ्हास होईल, याची काळजी घेणे गरजेचे आहे.
- डॉ. मयूर डंगर, बैलघोडा पशुवैद्यकीय रुग्णालय
-------------------------------------------------------------------
उपचार घेतलेल्या पक्ष्यांची संख्या
कबुतर ७०
घार ५३
कावळा ३१
मैना ०२
बगळे ०२
घुबड ०२

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com