मुंबई विद्यापीठाच्या नामविस्ताराची चर्चा

मुंबई विद्यापीठाच्या नामविस्ताराची चर्चा

मुंबई, ता. १३ : राज्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे; डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, संभाजीनगर; पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ, सोलापूर; बहिणाबाई चौधरी विद्यापीठ, जळगाव; स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ, नांदेड आदी विद्यापीठांचे नामविस्तार झालेले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाचे ‘साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे मुंबई विद्यापीठ’ असा नामविस्तार करण्याची मागणी करण्यात येत आहे.
मुंबईत सोमवारी होत असलेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही नामविस्ताराची मागणी करण्यात आल्याने यावर अनेक पक्ष संघटनांकडून हा विषय गांभीर्याने घ्यावा, अशी मागणी मानवमुक्ती मिशन आणि शैव, शाक्त परिषदेमार्फत ज्येष्ठ कीर्तनकार व विचारवंत ह.भ.प. धर्मकीर्ती महाराज परभरणीकर (नितीन सावंत) यांनी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी, प्र-कुलगुरू डॉ. अजय भामरे आणि कुलसचिव डॉ. बळीराम गायकवाड यांच्याकडे केली आहे. यासोबत राज्यपाल रमेश बैस यांच्याकडेही ई-मेलद्वारे मागणी केली आहे.

१९९० पासून मागणी केली जात आहे. यासंबंधी असंख्य निवेदने, मोर्चे, आंदोलने, धरणे आंदोलने मुंबईत झाली आहेत. साठे यांचे महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये, त्याचबरोबर मराठी मायभूची पताका संपूर्ण जगामध्ये फडकावण्यामध्ये मोठे योगदान आहे. रशिया, चेक रिपब्लिक, इटली, जर्मनी, चीन यांसारख्या देशांमध्ये त्यांचे साहित्य भाषांतरित झाले. त्यानिमित्ताने मराठी भाषेची पताका ही जगभर पसरली. त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये एक अग्रगण्य लोकसंग्राहक लोकशाहीर म्हणून हा लढा संपूर्ण सीमावर्ती भाग व महाराष्ट्रामध्ये पसरवला.
आपल्या शाहिरीच्या, कलापथकाच्या माध्यमातून मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती यासाठी एक उग्र लढा उभारला. त्यामध्ये स्वतः तुरुंगवासही भोगला. त्यांचे बहुतांश अजरामर असे साहित्य मुंबईतून निर्माण झाले आणि ते जगभरात पोहोचले. यामुळे त्यांचे हे नाते स्पष्ट करण्यासाठी मुंबई विद्यापीठाचा नामविस्तार करून ते त्याचे ‘साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे मुंबई विद्यापीठ’ असे करावे, अशी मागणी मानव मुक्ती मिशन आणि शाक्त शैव परिषदेच्या बायजाबाई घोडे, विलास रणखांबे, रामप्रसाद अंभुरे आदींनी केली आहे.
--
साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य‍िक म्हणून आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत प्रचंड मोठे योगदान राहिलेले आहे. कष्टकरी, कामगार, शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांनी आपल्या साहित्यातून मांडल्या. मुंबईशी त्यांचे घनिष्ठ नाते असून त्यामुळे मुंबई विद्यापीठाचा नामविस्तार त्यांच्या नावाने होणे आवश्यक आहे.
- चंद्रकांत वानखेडे, ज्येष्ठ साहित्यिक, नागपूर
--
मुंबई विद्यापीठाचा नामविस्तार होणार असल्यास अण्णा भाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत कलापथकाच्या माध्यमातून, मराठी साहित्याच्या माध्यमातून, तसेच कम्युनिस्ट पक्षाच्या माध्यमातूनही केलेले मोठे समर्पित कार्य लक्षात घेता, ‘साहित्य रत्न कॉम्रेड अण्णा भाऊ साठे मुंबई विद्यापीठ’ असे करण्यास कोणाचीच हरकत असण्याचे खरे तर काहीच कारण असणार नाही.
- डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, संयोजक, महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com