शिक्षक, पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका पुढे ढकलल्या

शिक्षक, पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका पुढे ढकलल्या

शिक्षक, पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका पुढे ढकलल्या
शिक्षक संघटनेत श्रेयवादाचे राजकारण पेटले
मुंबई, ता. १४ : राज्यातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाचे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी केवळ दोन दिवसांचा अवधी शिल्लक असतानाच या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय भारत निवडणूक आयोगाने घेतला आहे. राज्यात सुरू असलेल्या लोकसभा निवडणुका आणि उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात शिक्षक मतदार आपल्या गावी गेल्याने ते १० जून रोजी होणाऱ्या मतदानाला गैरहजर राहतील, असा दावा करत शिक्षक संघटनांनी ही निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. पुढे ढकलण्यात आलेली ही निवडणूक जून महिन्याच्या अखेरीस अथवा जुलै महिन्यात होण्याची शक्यता वर्तवली आहे.

मुंबई, नाशिक येथील शिक्षक आणि मुंबई, कोकण येथील पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याच्या दिवशीच महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने केली होती. त्यानंतर शिक्षक भारती, शिक्षक सेना, शिक्षण क्रांती, भाजप शिक्षक आघाडी आदी संघटनांनी केली होती. आता ही निवडणूक पुढे ढकलण्यात आल्यानंतर आता शिक्षक संघटनांमध्ये श्रेयवाद सुरू झाला आहे.
मुंबई पदवीधर मतदारसंघातून विलास विनायक पोतनीस, कोकण पदवीधर मतदारसंघातून निरंजन वसंत डावखरे, नाशिक शिक्षक मतदारसंघातून किशोर भिकाजी दराडे आणि मुंबई शिक्षक मतदारसंघातून कपिल हरिश्चंद्र पाटील हे ७ जुलै रोजी निवृत्त होत आहेत. त्यामुळे २ शिक्षक मतदारसंघ आणि २ पदवीधर मतदारसंघाकरिता निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता.
--
मुंबईत अशी होती तयारी
मुंबई शिक्षक मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेकडून शिक्षक सेनेचे अध्यक्ष ज. मो. अभ्यंकर; तर राज्य शिक्षक परिषदेमार्फत कार्यवाहपदी असलेले शिवनाथ दराडे व शिक्षक भारतीनेही सुभाष मोरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले होते; तर भाजपने उमेदवार जाहीर न करता सावध पवित्रा घेतला होता.
--
पदवीधरसाठी तयारी
मुंबईत शिवसेनेच्या (उबाठा) विद्यमान पदवीधर उमेदवारांऐवजी दुसरा पर्याय देण्याची तयारी सुरू केली होती. दोन दिवसांत नाव जाहीर केले जाणार होते; तर कोकण मतदारसंघात विद्यमान पदवीधर आमदार निरंजन डावखरे यांची तयारी सुरू झाली होती; मात्र भाजपकडून त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आला नव्हता. या मतदारसंघात संभाव्य परिस्थिती पाहून नवीन उमेदवार देण्याची चर्चा सुरू झाली होती.
*****
शिक्षण विभागाने २ मे ते १४ जूनपर्यंत सुट्टी जाहीर केली असून शाळा १५ जूननंतर सुरू होणार आहेत. तसेच १७ ते २० जूनपर्यंत बकरी ईदनिमित्त उर्दू माध्यमांच्या शाळांना सुट्टी आहे; तर मुंबईतील उत्तर भारतीय शिक्षक ११ जून रोजी मुंबईत परतणार आहेत. त्यामुळे शिक्षक भारतीचे सुभाष मोरे यांनी उच्च न्यायालयात ॲड. सचिन पुंडे यांच्यामार्फत याचिका दाखल केली होती. आज (ता. १४) त्या याचिकेवर सुनावणी घेण्यात आली. त्या वेळी केंद्रीय निवडणूक आयोगाने शिक्षक भारतीच्या मागणीचा विचार करून ही निवडणूक पुढे ढकलल्याची माहिती खंडपीठाला दिली.
*****

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com