फुटला घाम, मुंबईकर हैराण

फुटला घाम, मुंबईकर हैराण
Published on

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : वाढती उष्णता आणि सततच्या घामाने मुंबईसह उपनगरातील नागरिक हैराण झाले आहेत. दिवसेंदिवस उकाडा नकोसा झाला आहे. गारव्यासाठी सावली घेतली तरी पुन्हा उन्हाचे चटके बसतातच. यामुळे आजारांनाही आमंत्रण मिळत आहे. डिहायड्रेशन,  व्हायरल फिव्हर,  स्त्रियांमधील यूटीआय इन्फेक्शन, डायरिया,  मायग्रेन,  पोटासंबंधी आजार, डोळ्यांचा संसर्ग, उष्माघातासारखे अनेक आजार बळावत आहेत. त्यामुळे उष्माघाताचे लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन आरोग्य तज्ज्ञ करत आहेत.
यंदा उन्हाळा फेब्रुवारीपासूनच जाणवू लागला आहे. एप्रिलच्या मध्यापासून तर उष्णतेचा पारा ४०शी पार झाला. वातावरणातील या बदलामुळे अनेकांना उष्माघाताचा सामना करावा लागत आहे. अनेक जण उन्हामध्ये सतत काम करत असतात. तर काही जणांना उन्हातून कायम प्रवास करावा लागतो. अशा वेळी शरीरातील तापमान नियंत्रित करण्याच्या यंत्रणेत बिघाड होतो. परिणामी, शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. या काळात अति घामाचे प्रमाणही वाढत असते. त्यामुळे कोणत्याही सुरक्षेशिवाय उन्हामध्ये फिरल्यास उष्माघाताचा त्रास होण्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. वाढत्या उकाड्यामुळे पंख्याची हवा सुद्धा गरम लागत असल्याने घामाच्या धारा सुरू असतात.
शरीरातील उष्णता घामाच्या माध्यमातून जात असल्याने लघुशंकेचे प्रमाण या काळात कमी होते. त्यामुळे उन्हाळ्यात मूतखडासारखे आजार अधिक होतात. सध्या आरोग्याच्या जनजागृतीमुळे नागरिक लक्षणे आढळताच रुग्णालयात तपासणीसाठी धाव घेत आहेत. डिहायड्रेशन,  व्हायरल फिव्हर,  स्त्रियांमधील यूटीआय इन्फेक्शन, डायरिया,  मायग्रेन,  पोटासंबंधी आजार, डोळ्यांचा संसर्ग आदी रुग्ण वाढत आहेत.

यांचा वापर करा
उन्हाचा थेट मारा डोक्यावर होत असल्याने टोपी, पागोटे, दुपट्टा, पदर, रुमाल इत्यादीने डोके झाकून घ्यावे. शक्य होईल तेव्हा सावलीचा वापर करावा. सुती, सैल किंबहुना सफेद कपडे घातल्यास उपयुक्त असतात. यामुळे शरीराचे तापमान नियंत्रण ठेवण्यास थोडीफार मदत होते. दुसरीकडे उन्हाच्या तीव्र किरणांमुळे डोळ्यांचे आजारही वाढत आहेत. डोळ्यासमोर अंधार येणे, नजर कमजोर होणे आदी त्रास जाणवू लागतात. त्यामुळे डॉक्टर गॉगल वापरण्याचा सल्लाही देत आहेत.

उघड्यावरील पदार्थ घातक
उन्हाळ्यात उघड्यावर कापून ठेवलेली फळे खाणे टाळावे. अशा फळांमधून त्यावर बसलेल्या माशांमुळे टायफॉईड,  कावीळ,  गॅस्ट्रो या आजारांची लागण होते. फळांच्या रसामध्ये वापरलेला बर्फही अत्यंत घातक असतो. उन्हाळ्यामध्ये उसाच्या रसवंतीवर खूप गर्दी होते. पण, यातून बऱ्याचदा कावीळ,  टायफॉइडची लागण होते. म्हणून अस्वच्छ रसवंतीवरील रस पिण्याचे टाळावे.

उष्माघाताची लक्षणे
घाम येणे,  मळमळ,  उलट्या,  जीव घाबरणे आणि जास्त प्रमाणात थकवा येणे,  त्वचा निळी पडणे आणि शरीराचे तापमान कमी होते. चक्कर येणे,  रक्तदाब आणि नाडीचे ठोके कमी होणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळ्यानंतर रुग्णास ताबडतोब रुग्णालयात दाखल करून औषधोपचार करावा.

जागरूकतेमुळे तपासण्यात वाढ
वाढत्या उष्णतेमुळे आरोग्याच्या समस्या उद्‍भवण्याचा धोका वाढत आहे. यात चक्कर येणे,  डिहायडेशन,  उलट्या, अपचन,  मायग्रेन याचा त्रास होतो. यासोबतच उन्हाळ्यात अनेकांना किडनी स्टोन म्हणजेच मुतखड्याचा त्रास होणाऱ्या रुग्णांची संख्या प्रकर्षाने वाढत आहे. काही दिवसांपासून पोटाचे एक्स-रे,  सोनोग्राफी अशा तपासण्या वाढल्या आहेत. उन्हाळ्यात मुतखड्याच्या रुग्णांमध्ये वाढ होते असे नाही, तर मुतखड्याच्या विकाराबाबत जागरूकता निर्माण झाल्याने तपासण्या वाढल्या आहेत. यामुळे अनेक रुग्णांची नोंद होत आहे, असे ओपोलो स्पेक्ट्रा रुग्णालयातील मुख्य पॅथॉलॉजिस्ट डॉ. राजेश बेंद्रे म्हणाले

मुतखड्याची लक्षणे
मुतखड्याचा त्रास असलेल्या अनेक रुग्णांमध्ये कुठल्याही प्रकारची लक्षणे नसतात. मूत्रपिंडात खडे असलेल्या व्यक्तीला लघवी करताना वेदना आणि जळजळ,  लघवीत रक्त येणे,  मळमळ,  उलट्या,  ओटीपोटात दुखणे आणि पाठदुखी,  वारंवार लघवी होणे आणि ताप यांसारखी लक्षणे दिसून येतात. याकडे दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

मासिक पाळीत अनियमितता
स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. श्वेता लाडगुडी म्हणाल्या की,  उन्हाळ्यात तापमान जास्त असल्याने सततच्या घामामुळे होणारा डिहायड्रेशनचा परिणाम मासिक पाळीवर होतो. उन्हाळ्यात  मासिक पाळी दीर्घ काळ राहू शकते. पौगंडावस्थेतील मुली आणि पेरी-मेनोपॉज अवस्थेतील महिलांना हार्मोन्स अस्थिर असल्यामुळे जास्त त्रास होतो. यामुळे थकवा,  तणाव,  पुरळ आणि अगदी अस्वस्थता यांसारखी विविध चिंताजनक लक्षणे मासिक पाळीच्या वेळी दिसतात. बहुसंख्य महिलांना या कालावधीत यीस्ट संसर्गाचा त्रास होतो. कारण गरम आणि दमट वातावरणात जीवाणूंची झपाट्याने वाढ होते. शिवाय,  उन्हाळ्यात योनी मार्गात होणारे संक्रमणही अनियमित मासिक पाळीच्या कारणांपैकी एक असू शकते. जास्त घाम येणे, उन्हाळ्यात इलेक्ट्रोलाइट असंतुलन,  त्वचेला खाज सुटणे आणि यीस्ट इन्फेक्शन होऊ शकते. तुमच्या खाण्याच्या सवयींचाही मासिक पाळीवर परिणाम होऊ शकतो. आंबा,  पपई किंवा अननस यांसारखे उष्ण पदार्थ खाल्ल्याने तुमची मासिक पाळी लवकर येते,. कारण त्यामुळे ओटीपोटात उष्णता निर्माण होते आणि गर्भाशय आकुंचन पावते. तणावही मासिक पाळीवर परिणाम करू शकतो. त्यामुळे उन्हाळ्यात पुरेसे पाणी प्यावेत. खारट पदार्थांचे सेवन करू नका,  शारीरिक स्वच्छता राखा आणि यीस्ट संसर्ग टाळण्यासाठी तुमचे सॅनिटरी पॅड किंवा टॅम्पोन्सनस वेळोवेळी बदला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com