उच्च रक्तदाब मूत्रपिंडासाठी घातक

उच्च रक्तदाब मूत्रपिंडासाठी घातक

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : बैठी जीवनशैली, लठ्ठपणा, व्यायामाचा अभाव आणि तणाव यांसारख्या विविध कारणांमुळे १५ ते ६० वयोगटातील व्यक्तींमध्ये उच्च रक्तदाबाची समस्या वाढत आहे. भारतातील लाखो लोक हायपरटेन्शनसारख्या समस्येसह जगत आहेत. ही समस्या केवळ हृदय, मेंदू आणि डोळ्यांवरच नाही, तर मूत्रपिंडांवर परिणाम करते. यामुळे अनेकदा शेवटच्या टप्प्यात मूत्रपिंडाच्या आजाराचे निदान होते. हायपरटेन्शन असलेल्या तब्बल ५० टक्के व्यक्तींना किडनी विकाराचा सामना करावा लागतो. अशा वेळी त्यांना डायलिसिस किंवा प्रत्यारोपणाची आवश्यकता भासू शकते.
उच्च रक्तदाब हे शहरी आणि ग्रामीण लोकसंख्येमध्ये आढळून येणारा सर्वसामान्य विकार आहे, ज्यामुळे देशभरात विकृती आणि मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, उच्च रक्तदाब असलेल्यापैकी निम्म्या लोकांनी जरी त्यांचा रक्तदाब नियंत्रणात ठेवला, तर २०४० पर्यंत भारतातील किमान ४.६ दशलक्ष मृत्यू टाळता येऊ शकताे. या अहवालानुसार, देशातील १८८.३ दशलक्ष लोकांपैकी केवळ ३७ टक्के लोकांना त्यांच्या आजाराबद्दल माहीत आहे. तर जागतिक लोकसंख्यांपैकी अंदाजे ३३ टक्के व्यक्तींना उच्च रक्तदाब आहे. त्यातील केवळ अर्ध्याहून अधिक जणांचे निदान झाले आहे. उच्च रक्तदाब (१४०/९० एमएमएचजी किंवा त्याहून अधिक) हा स्ट्रोक, हृदयविकाराचा झटका, हृदय आणि मूत्रपिंड निकामी होण्यास कारणीभूत ठरतो.

कसा होतो परिणाम?
अनियंत्रित उच्च रक्तदाब हा मूत्रपिंडाच्या सभोवतालच्या रक्तवाहिन्या अरुंद, कडक किंवा कमकुवत करू शकतात. ज्यामुळे मूत्रपिंडाचे रक्तशुद्धीकरण करणे, द्रव आणि इलेक्ट्रोलाइट्सचे नियमन करण्याच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो. हायपरटेन्शनमुळे मूत्रपिंडातील रक्तवाहिन्या आणि शुद्धीकरण प्रक्रियेचे नुकसान होते आणि शरीरातील टाकाऊ पदार्थ काढून टाकणे आव्हानात्मक ठरते. अनियंत्रित उच्च रक्तदाबामुळे मूत्रपिंड निकामी किंवा अंतिम टप्प्यातील रेनल आजाराचा सामना करावा लागू शकतो.

३० टक्के लोकांचे मूत्रपिंडाचे नुकसान
उच्च रक्तदाब असलेल्या ३० टक्के लोकांमध्ये किडनीचे नुकसान होते आणि त्यांना डायलिसिस किंवा प्रत्यारोपणाची आवश्यकता भासते. बऱ्याच रुग्णांना हायपरटेन्शनचे निदान तेव्हाच होते, जेव्हा मूत्रपिंडाच्या कार्यात अडथळे येतात. स्ट्रोक किंवा हृदयविकाराचा झटका यांसारख्या गुंतागुंतीचा सामना करावा लागतो.

मूत्रपिंडाच्या विकाराने ग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. दर महिन्याला सुमारे ८० ते १०० रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात धाव घेत आहेत. मूत्रपिंडाच्या समस्यांसह उपचारासाठी आलेल्या रुग्णांपैकी ५० ते ७५ टक्के रुग्णांना उच्च रक्तदाब असल्याचे आढळून येते. हायपरटेन्शनमुळे मूत्रपिंडातील रक्तवाहिन्यांवर ताण येऊन नेफ्रोस्क्लेरोसिससारख्या समस्येला सामोरे जावे लागते. ही एक अशी स्थिती आहे, ज्यामध्ये किडनीला जखमा होतात. यामुळे शरीरात विषारी पदार्थ साचून टाकाऊ पदार्थांना फिल्टर करण्याच्या मूत्रपिंडाच्या क्षमतेवर परिणाम होतो. हायपरटेन्शनमुळे रक्तदाब नियंत्रित करण्यात आणि मूत्रपिंडात द्रव संतुलन राखण्यात गुंतलेल्या हार्मोन्स आणि एन्झाईम्समध्येही असंतुलन होते.
- डॉ. रुजू गाला, सल्लागार, नेफ्रोलॉजिस्ट आणि रेनल ट्रान्सप्लांट फिजिशियन

रक्तदाब नियंत्रणासाठी काय कराल?
* कमी मीठयुक्त आहार घ्या.
* चालणे, जॉगिंग आणि योगासारखे नियमित व्यायाम करा.
* धूम्रपान करणे थांबवा.
* मद्यपान कमी प्रमाणात करा.
* वजन जास्त किंवा लठ्ठ असल्यास ते कमी करा.
* डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे नियमितपणे घ्या.
* रक्तदाब अचूकपणे मोजा, त्यावर नियंत्रण ठेवा, दीर्घकाळ जगा या थीमप्रमाणे विश्रांती घ्या.

हायपरटेन्शनची लक्षणे
* डोकेदुखी * श्वास लागणे
* चक्कर येणे * नाकातून रक्त येणे
* दृष्टीमध्ये बदल * छाती दुखणे
* थकवा * पायांना सूज येणे
* हृदयाचे असामान्य आवाज
* डोळ्याच्या रक्तवाहिन्या अरुंद होणे
* रेटिनल रक्तस्त्राव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com