बदलती जीवनशैली देते लठ्ठपणाला निमंत्रण

बदलती जीवनशैली देते लठ्ठपणाला निमंत्रण

जागतिक बाल लठ्ठपणा दिन


सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : लहान मुलांमधील लठ्ठपणा हा अनेक रोगांना आमंत्रण देतो. अनुवंशिकता, ठराविक विकार आणि गर्भधारणा यांसारखे  बाह्य घटक, तर बदलती जीवनशैली, अपुरी झोप, वाढलेला ताणतणाव आणि आतड्यांतील मायक्रोबायोम हे अंतर्गत घटक लठ्ठपणासारख्या आजारास कारणीभूत ठरतात. जनरेशन एक्सएल ओबेसिटी फाऊंडेशन  हे लहान मुलांमधील लठ्ठपणाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि त्यांच्या जीवनाचा दर्जा सुधारण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. जागतिक बाल लठ्ठपणा दिनानिमित्त फाऊंडेशनचे संस्थापक डॉ. संजय बोरुडे यांचे विशेष चर्चासत्र घेण्यात आले होते. त्या‍ वेळेस महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसेप्रमुख राज ठाकरे उपस्थित होते.

लठ्ठपणा ही आजारांची जननी आहे. हा एक स्व-निदान करता येणारा आजार असून जागतिक स्तरावर याचे प्रमाण वाढत आहे. ॲटलसच्या मते २०३५ पर्यंत ५१ टक्के लोक लठ्ठपणाने ग्रासलेले असतील. तर, ८७ टक्के डॉक्टरांना बालपणातील लठ्ठपणावर उपचारांविषयी  माहिती नसल्याची गंभीर आकडेवारी समोर आली आहे. ५५ टक्के मुले पौगंडावस्थेत लठ्ठ होतात आणि ८० टक्के किशोरवयीन मुले प्रौढावस्थेत लठ्ठ होतात, असे आढळून आले आहे. महाराष्ट्रात दोन गोष्टी पाहायला मिळतात, एक म्हणजे कमी वजनाची आणि कुपोषित बालक, तर दुसरीकडे शहरी जीवनशैलीमुळे मुलांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण वाढले आहे. पंतप्रधान मोदींनी सुरू केलेल्या आयुष्मान भारत योजनेद्वारे गर्भवती महिलांनी याबाबत काळजी घेतली पाहिजे. केंद्र सरकारही लठ्ठपणाबद्दल जागरूकता कार्यक्रम आयोजित करत आहे.

पीटीचा तास सक्तीचा करावा
प्रत्येक शाळेत किमान दोन शिक्षक प्रशिक्षित केले जावेत. ज्यांना मुलांचा लठ्ठपणा, पोषण आणि इतर योजनांबाबत सखोल माहिती असेल. ते लठ्ठ मुलांना ओळखण्यास सक्षम असतील आणि त्यांच्या पालकांचे समुपदेशन करतील. हा उपक्रम संपूर्ण भारतातील शाळांमध्ये राबवण्यात येणार आहे. त्यामुळे शाळांनी मुलांसाठी पीटीचा तास  सक्तीचा करावा. भारतीय अन्न सुरक्षितता आणि प्रमाणही संस्थेच्या मदतीने उत्पादकांना पॅकेज केलेल्या अन्नावर सर्व पोषण माहिती नमूद करावी लागणार. मुलांना फास्ट फूडमधून बाजरीसारख्या सुपरफूडकडे जाण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल, असे मत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

फाऊंडेशनचा पुढाकार
दोन वर्षांपूर्वी डॉ. संजय बोरुडे यांनी जनरेशन एक्सएल ओबेसिटी फाऊंडेशनची सुरुवात केली.  जागतिक बाल लठ्ठपणा दिन २२ मे रोजी साजरा करण्यासाठी या फाऊंडेशनला सुरुवात झाली. वेब पोर्टल,  हेल्पलाईन फॉर चाइल्डहूड ओबेसिटी, जनरेशन एक्सएल-बुक अशा विविध उपक्रमांद्वारे विविध स्तरांवर जनजागृतीही करण्यात आली. बाल लठ्ठपणास प्रतिबंध आणि व्यवस्थापनासाठी ठोस पाऊल उचलण्यात आली. आता, फाऊंडेशनने या समस्येचा सामना करण्यासाठी आणि लठ्ठपणावर मात करण्यासाठी एक संवादात्मक सत्र आयोजित करून एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

जनरेशन एक्सएल ओबेसिटी फाऊंडेशनने ११ महिने ते १७ वर्षे वयोगटातील लठ्ठपणाशी झुंजणाऱ्या अनेक मुलांना आयुष्याची दुसरी संधी दिली आहे. लठ्ठपणा हा प्राणघातक परंतु टाळता येण्याजोगा आजार आहे. मुलांना संतुलित आहार देणे, दररोज व्यायाम आणि औषधोपचाराकरिता प्रोत्साहन देणे गरजेचे आहे अशी प्रतिक्रिया
- डॉ संजय बोरुडे, संस्थापक, जनरल एक्सएल ओबेसिटी फाउंडेशन

पालकांना त्यांच्या मुलांना निरोगी आणि गुबगुबीत ठेवायला आवडते; परंतु गुबगुबीत असणे म्हणजे लठ्ठपणा. पालकांना लठ्ठपणासारख्या आजाराबाबत शिक्षित करणे आणि जनजागृतीचे करणे ही डॉक्टरांची जबाबदारी आहे. घरी बनवलेल्या अन्न खाल्यास मुले निरोगी राहतात.
- राज ठाकरे, पक्षप्रमुख, मनसे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com