हिंदी भाषिकांचा संमिश्र प्रतिसाद

हिंदी भाषिकांचा संमिश्र प्रतिसाद

मिलिंद तांबे ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : लोकसभा निवडणुकीत हिंदी भाषक मतदारांचा महाविकास आघाडी आणि महायुतीला संमिश्र प्रतिसाद दिल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. महायुतीने काही अंशी अधिक मते घेतली; मात्र महाविकास आघाडीने हिंदी भाषिक पट्ट्यात चांगली मते मिळवत आपली पुनर्वापसी केली आहे. यामुळे विजय मिळवणाऱ्या उमेदवारांच्या विजयात हिंदी भाषकांच्या मतांचा मोठा वाटा राहिला.

मुंबईतील दहिसर, बोरिवली, मुलुंड, जोगेश्वरी, अंधेरी, चांदिवली, कालिना, कुर्ला, मालाड, कांदिवली, मानखुर्द शिवाजीनगर, वांद्रे, वडाळा, सायन कोळीवाडा या विधानसभा मतदारसंघांत हिंदी भाषक मतदारांची संख्या अधिक आहे. २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीतच या भागातून महायुतीला भरघोस मते मिळाल्याने त्यांचे उमेदवार एकहाती जिंकून आले होते. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मात्र हिंदी भाषिक पट्ट्यातून महायुती आणि महाविकास आघाडीला काहीसा संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे दिसते. या भागातून साधारणत: एकूण १९ लाख ६८ हजार ३६८ इतके मतदान झाले. त्यापैकी महायुतीला १० लाख ४४ हजार २३१ (५३.०५ टक्के) मते मिळाली, तर महाविकास आघाडीला नऊ लाख २४ हजार १३७ (४६.९५ टक्के) मते मिळाली. महायुतीने महाविकास आघाडीपेक्षा एक लाख २० हजार ९४ इतकी अधिक मते घेतली.

हिंदी भाषिक पट्ट्यातून महायुतीला काहीशी अधिक मते मिळाली, तर महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी तब्बल ८ विधानसभांमध्ये मतांची आघाडी घेतली आहे; तर महायुतीच्या उमेदवारांना केवळ सहा विधानसभा मतदारसंघात आघाडी घेता आली आहे.

मुंबईतील साधारणत: १४ विधानसभा मतदारसंघात हिंदी भाषक मतदारांची संख्या प्रभावशाली आहे. येथील मतांचा सर्वाधिक फायदा हा मुंबई उत्तर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार पियूष गोयल यांना झाला आहे. त्याखालोखाल महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांनी सर्वाधिक मते मिळवली आहेत. त्यानंतर महाविकास आघाडीच्या वर्षा गायकवाड, महायुतीचे रवींद्र वायकर यांना हिंदी भाषकांची मते मिळवण्यात यश आले आहे.
..............................
एकूण मते - सुमारे १९,६८,३६८
महायुतीला मिळालेली मते - सुमारे १०,४४,२३१ (५३.०५ टक्के)
महाविकास आघाडीला मिळालेली मते - ९,२४,१३७ (४६.९५ टक्के)

आघाडी
महाविकास आघाडी - ८ ठिकाणी
महायुती - ६ ठिकाणी

सर्वाधिक फायदा झालेले उमेदवार
-पियूष गोयल - महायुती
-संजय दिना पाटील - महाविकास आघाडी
-वर्षा गायकवाड - महाविकास आघाडी
-रवींद्र वायकर - महायुती
..........................
हिंदी भाषिक प्रभाव असलेले विधानसभा मतदारसंघ
दहिसर, बोरिवली, मुलुंड, जोगेश्वरी, अंधेरी, चांदिवली, कालिना, कुर्ला, मालाड, कांदिवली, मानखुर्द शिवाजीनगर, वांद्रे, वडाळा, सायन कोळीवाडा.
...........................

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com