चंद्रकांत कुलकर्णी नाट्यमहोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात

चंद्रकांत कुलकर्णी नाट्यमहोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात

चंद्रकांत कुलकर्णी नाट्य महोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात

पहिल्याच दिवशी प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : सकाळ माध्यम समूह आयोजित चंद्रकांत कुलकर्णी नाट्य महोत्सवाला आज विलेपार्ले येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहामध्ये मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. विविध प्रकारच्या नाट्यकलाकृतींना कलात्मक दिग्दर्शनाचा साज चढवणारे प्रतिभावंत रंगकर्मी चंद्रकांत कुलकर्णी यांच्या रंगभूमीवरील कारकिर्दीला नुकतीच ४० वर्षे पूर्ण झाली. त्यांच्या गौरवशाली कारकिर्दीच्या सन्मानार्थ ‘सकाळ’ने ७ ते ९ जूनदरम्यान मुंबईत हा महोत्सव आयोजित केला आहे.
नाट्य महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी प्रशांत दळवी लिखित व चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘चारचौघी’ या नाटकाचे सादरीकरण झाले. त्याला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला. चंद्रकांत कुलकर्णी नाट्य महोत्सवात ‘चारचौघी’तील नाटकातील कलावंत व ज्येष्ठ रंगकर्मी रोहिणी हट्टंगडी, मुक्ता बर्वे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, आमदार पराग आळवणी, महोत्सवाचे प्रायोजक वामन हरी पेठेच्या अंजली पेठे, सहप्रायोजक पितांबरी उद्योग समूहाचे विक्री अधिकारी मंदार फडके, ‘सकाळ’ माध्यम समूहाचे मल्टिमीडिया संपादक अंकित काणे, सकाळ मुंबई आवृत्तीचे व्यवस्थापक उमेश पिंगळे, ‘सकाळ’च्या सहायक सरव्यवस्थापिका सोनाली कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रतिभावंत रंगकर्मी चंद्रकांत कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. ‘सकाळ’ने आयोजित केलेल्या नाट्य महोत्सवाबद्दल त्यांनी आभार मानले. मुंबईत आल्यानंतर आपण ‘सकाळ’मध्ये कसे रुजू झालो, याच्या आठवणी सांगत ते भावूकही झाले. कुलकर्णी म्हणाले, ‘‘मी ३६ वर्षांपूर्वी मुंबईत आलो ते नाटकात काम आणि दिग्दर्शन करण्यासाठी, मात्र सुरुवातीला उपजीविकेसाठी मुंबईत ‘सकाळ’मध्ये उपसंपादक म्हणून १४ मार्च १९८८ रोजी रुजू झालो. तेव्हाचे संपादक, मित्र आणि सर्वांना माहीत होते की, हा आपल्याकडे काही दिवसांचा पाहुणा आहे. पुढे हा कलाक्षेत्रातच जाणार. त्यांनी सगळ्यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळेच मी कलाक्षेत्रात काम करू शकलो. हे सर्व वर्तुळ तयार व्हायचे होते, याचे मला समाधान वाटते.’’

‘सकाळ’ करंडक जोमाने होणार
चंद्रकांत कुलकर्णी यांनी पुढे सांगितले की, ‘‘मी ‘सकाळ’च्या सर्व उपक्रमांशी संबंधित आहे. मधुरांगण, युवकांसाठी असलेले व्यासपीठ ‘यिन’, ‘सकाळ करंडक’ यात माझा सहभाग असतो. सकाळ करंडकाचा मी सहा वर्षे ब्रँड ॲम्बॅसेडर होतो. आता पुन्हा जोरदार सुरुवात केली आहे. यावर्षी महाराष्ट्रात आम्ही ‘सकाळ करंडक’ स्पर्धा दहा केंद्रांवर घेणार आहोत. त्यासाठीच्या तयारीला आम्ही लागलो आहोत.’’ पुढे ते म्हणाले, ‘चारचौघी’ या नाटकात काम करणार‍ा निनाद लिमये याने पहिल्यांदा ‘सकाळ करंडक’मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनयाचे बक्षीस माझ्या हस्ते स्वीकारले होते. त्याचे रुईया महाविद्यालयाशी नाते होते, हेही एक वर्तुळ आज यानिमित्ताने पूर्ण होत आहे.
--
सकाळ नाट्य महोत्सवात
वाचकांसाठी विशेष सवलत
मुंबई, ता. ७ ः सकाळ माध्यम समूह आयोजित चंद्रकांत कुलकर्णी नाट्य महोत्सवानिमित्त रसिकांसाठी विशेष सवलत देण्यात आली आहे. विलेपार्ले येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहामध्ये हा महोत्सव सुरू असून, ‘सकाळ’च्या मुंबई आवृत्तीचा अंक दाखवून प्रत्येक नाट्यरसिकाला तिकिटावर सवलत मिळेल. महोत्सवात सादर होणाऱ्या नाटकाचे तिकीट अवघ्या १०० रुपयांत मिळणार आहे. ही सवलत पहिल्या १०० नाट्यरसिकांना देण्यात येणार असून, सवलतीच्या दरातील तिकिटे नाट्यगृहावर मिळतील. यासाठी बुकिंगही करता येणार आहे. बुकिंगसाठी मोबाईल क्रमांक : ९३२२३१९६८३

‘सकाळ’कडून सांस्कृतिक मेजवानी
नाट्य महोत्सवात सादर होणारी नाटके ही इतर वेळातही सादर होतात. चारही नाटके एकत्र आणून त्यात आपण एका वेगळ्याच राजकीय वातावरणातून बाहेर पडण्यासाठी एक चांगली सांस्कृतिक मेजवानी ‘सकाळ’ने आपल्याला दिली आहे, असे चंद्रकांत कुलकर्णी यांनी सांगितले.


सादर होणारी नाटके
शनिवार : ८ जून
दुपारी : ४ वाजता
‘हरवलेल्या पत्त्यांचा बंगला’
--
शनिवार : ८ जून
रात्रौ : ८.३० वाजता
‘आज्जी बाई जोरात’
--
रविवार : ९ जून
दुपारी : ४ वाजता
‘संज्या छाया’
--

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com