गोयल यांनी उपचार घेतले तरच जामीनात वाढ

गोयल यांनी उपचार घेतले तरच जामीनात वाढ

Published on

गोयल यांनी उपचार घेतले तरच जामिनात वाढ
ईडीची उच्च न्यायालयात माहिती
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : जेट एअरवेजचे माजी संस्थापक नरेश गोयल यांनी टाटा कॅन्सर रुग्णालयात स्वत:ची वैद्यकीय तपासणी केली व उपचार घेतले तर वैद्यकीय कारणास्तव मंजूर केलेला दोन महिन्यांचा अंतरिम जामीन आणखी तीन आठवड्यांसाठी वाढवला जाऊ शकतो, अशी माहिती अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाला दिली.
मनी लॉन्ड्रींगप्रकरणी अटकेत असलेले नरेश गोयल यांना वैद्यकीय कारणास्तव मुंबई उच्च न्यायालयाने दोन महिन्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे. जामिनाची मुदत आणखी वाढवण्यात यावी, यासाठी गोयल यांनी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर बुधावारी (ता. ३) न्या. एन.जे. जमादार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. गोयल यांच्या वतीने ज्येष्ठ वकील आबाद पोंडा यांनी युक्तिवाद केला. त्यांनी न्यायालयाला सांगितले की, ‘‘गोयल यांची तब्येत ढासळत आहे, तसेच त्यांचे मानसिक आरोग्यही बिघडत चालले आहे. ते नैराश्याच्या गर्तेत असून त्यांना आत्महत्येचे विचार येत आहेत. त्यांनी आपल्या पत्नीचा मृत्यू पाहिला आहे आणि आता ते स्वतःही त्याच त्रासातून जात आहेत. गोयल यांना आणखी चार आठवडे जामीन वाढवून दिल्यास त्यांच्यावर लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया करण्यात येईल. त्यानंतर कॅन्सरवर आणखी एक शस्त्रक्रिया करण्यात येईल.’’ न्यायालयाने याची दखल घेत गोयल यांना सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले व सुनावणी उद्या गुरुवारपर्यंत तहकूब केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.