तज्‍ज्ञ समितीच्या अहवालात मतभिन्नता

तज्‍ज्ञ समितीच्या अहवालात मतभिन्नता

Published on

तज्‍ज्ञ समितीच्या अहवालात मतभिन्नता
मलबार हिल जलाशय प्रकरण; आणखी तज्ज्ञांची नियुक्ती करणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : मलबार हिल जलाशय पुनर्बांधणीबाबतचा प्रश्न आणखी जटिल झाला आहे. जलाशयाच्या पुनर्बांधणीसाठी नियुक्त केलेल्या तज्‍ज्ञ समितीच्या अहवालात मतभिन्नता असल्याचे समोर आले आहे. त्‍यामुळे जलाशयाबाबतचा निर्णय आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात आमदार राजहंस सिंह यांनी मलबार हिल जलाशयाबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला. मलबार हिल ब्रिटिशकालीन जलाशय पुनर्बांधणीसंदर्भात महानगरपालिकेने नियुक्त केलेल्या आठ जणांच्या तज्‍ज्ञ समितीचे दोन अहवाल सादर झाले आहेत, परंतु त्यातून निष्कर्ष काढण्यात आलेला नसल्याची बाब निदर्शनास आल्याचे त्यांनी म्हटले आहे. सदर अहवालावर अंतिम निर्णय देण्यासाठी आणखी काही तज्‍ज्ञांची नियुक्ती केली जाणार आहे का, असा प्रश्नही त्यांनी यावेळी विचारला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत खुलासा करताना म्हटले आहे की, महानगरपालिकेने सदर जलाशयाच्या पुनर्बांधणीच्या प्रस्तावाचे पुनर्विलोकन करण्यासाठी आयआयटी मुंबई या संस्थेतील प्राध्यापक, स्थानिक तज्‍ज्ञ, तसेच महानगरपालिका उपायुक्त (विशेष अभियांत्रिकी) यांचा समावेश असलेली आठ सदस्यीय तज्‍ज्ञ समिती स्थापन केली होती. सदर समितीने चार सदस्यांचा प्रत्येकी एक अहवाल असे दोन स्वतंत्र अहवाल महानगरपालिकेस सादर केले आहेत. दोन्ही अहवालांमधील मते लक्षात घेता त्यामध्ये मतभिन्नता असल्याचे दिसून आले आहे. सदर अहवालावर अंतिम निर्णय देण्यासाठी आणखी काही तज्ज्ञांची नियुक्ती केली जाणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
महानगरपालिकेने गठित केलेल्या तज्‍ज्ञ समितीने सादर केलेल्या दोन स्वतंत्र अहवालामध्ये मतभिन्नता असल्यामुळे दोन्ही अहवालांचे विश्लेषण करून अंतिम निष्कर्ष सुचविण्याकरिता नागरी अभियांत्रिकीमधील ‘आयआयटी रुरकी’ या नामांकित संस्थेच्या तज्‍ज्ञ प्राध्यापकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सदर तज्‍ज्ञ प्राध्यापकांकडून मलबार टेकडी जलाशयाची जून महिन्यात अंतर्गत पाहणी करण्यात आली आहे. त्यांचा अंतिम अहवाल लवकरच अपेक्षित आहे. सदर मलबार टेकडी जलाशयाच्या पुनर्बांधणीच्या कामाच्या निविदेअंतर्गतच मूळ जलाशयाच्या पश्चिम बाजूस २३ द.ल.लि. क्षमतेचा अतिरिक्त कप्पा बांधून त्यावर सात द.ल.लि.ची तात्पुरती टाकी बांधून त्याची जोडणी मूळ जलाशयाच्या वितरण प्रणालीशी करण्यात येणार होती. जेणेकरून सद्यस्थितीत मलबार टेकडी जलाशयातून होणारा दैनंदिन पाणीपुरवठा सुरळीत ठेवून मूळ जलाशयाच्या पुनर्बांधणीचे काम टप्प्याटप्प्याने करण्याचे ठरले होते. तथापि, ‘आयआयटी रुरकी’ यांच्याकडून प्राप्त होणाऱ्या अहवालानुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.
या जलाशयामार्फत कुलाबा, फोर्ट, सीएसएमटी, कफ परेड, नरिमन पॉईंट, चर्चगेट, सँडहर्स्ट रोड, गिरगाव, काळबादेवी, मलबार हिल, नेपियन्सी रोड, ग्रँट रोडमधील विविध भागात पाणीपुरवठा केला जातो, दक्षिण मुंबईची वाढती पाण्याची मागणी विचारात घेऊन तसेच जलाशयाचे आयुर्मान संपुष्टात आले असल्यामुळे महानगरपालिकेमार्फत सदर जलाशयाच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेण्यात आले आहे.

अहवाल आल्‍यानंतर कार्यवाही
या कामासाठी २०२४-२५ या आर्थिक वर्षाकरिता महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकात आवश्यक निधीची तरतूद करण्यात आली असून ‘आयआयटी रुरकी’च्या तज्‍ज्ञ समितीचा पुनर्बांधणी विषयीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार सदर कामाबाबत पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.