मुंबईत ५ टक्के मृत्यू प्रदूषणामुळे

मुंबईत ५ टक्के मृत्यू प्रदूषणामुळे

मुंबईत ५ टक्के मृत्यू प्रदूषणामुळे
मृत्यूचा धोका वाढला; नव्या अभ्यासातील निष्कर्ष
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : मुंबईत एका वर्षात झालेल्या एकूण मृत्यूंपैकी ५,१०० मृत्यू (५.६ टक्के) प्रदूषणामुळे झालेत. ‘जागतिक आरोग्य संघटने’ने निश्चित केलेल्या अल्पकालीन पीएम २.५ शी आलेला संपर्क कारणीभूत होता. दिल्लीनंतर ही वाढ सर्वाधिक होती. या परिस्थितीमुळे दैनंदिन २.४१ टक्के मृत्यू होत असल्याचेही समोर आले आहे.
सध्याच्या भारतीय हवा गुणवत्ता मानकांपेक्षा कमी असलेल्या हवा प्रदूषणाच्या पातळीमुळे भारतातील मृत्यूंचा दैनंदिन दर वाढत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. लॅन्सेट प्लॅनेटरी हेल्थमध्ये प्रकाशित झालेल्या एका नवीन अभ्यासात असे आढळून आले आहे. ‘जागतिक आरोग्य संघटने’च्या (डब्ल्यूएचओ) मार्गदर्शक तत्त्वांपेक्षा अधिक असलेली हवा प्रदूषणाची पातळी भारतातील मुंबईसह दहा शहरांमध्ये दर वर्षी होणाऱ्या मृत्यूंसाठी कारणीभूत ठरत असल्याचे या अहवालात म्हटले आहे.
मुंबई, पुणे, अहमदाबाद, बंगळुरू, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, कोलकाता, पुणे, सिमला आणि वाराणसी या शहरांमध्ये प्रदूषणामुळे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. या शहरांमध्ये दरवर्षी होणाऱ्या ३३ हजार मृत्यूंसाठी प्रदूषण हा घटक कारणीभूत ठरत आहे.
बंगळुरू, कोलकाता, चेन्नई आणि मुंबई यांसारख्या उच्च हवा प्रदूषण नसलेल्या शहरांमध्येही मृत्यूचे प्रमाण लक्षणीय असल्याचे आढळून आले आहे. वरील दहा शहरांमधील २००८ ते २०१९ या कालावधीत नागरिकांचा पीएम २.५ शी होणारा संपर्क, तसेच दररोज होणारे मृत्यू या माहितीच्या विश्लेषणातून हा निष्कर्ष काढला आहे.
मुंबई, बंगळुरू आणि कोलकाता यांसारख्या यापूर्वी न अभ्यासलेल्या व तुलनेने कमी प्रदूषण असलेल्या शहरांमधील मृत्यूंच्या आकडेवारीचा अभ्यास करून हा अहवाल तयार केला आहे. हवेच्या गुणवत्तेचे राष्ट्रीय पातळीवरील नियम अधिक कठोर करणे गरजेचे आहे आणि हवेच्या प्रदूषणाची पातळी नियंत्रणात आणण्यासाठीचे प्रयत्न दुप्पट करण्याची आवश्यकता आहे, हा या अभ्यासाचा निष्कर्ष आहे.
भारत (सस्टेनेबल फ्युचर्स कोलॅबरेटिव्ह, अशोका युनिव्हर्सिटी, सेंटर फॉर क्रोनिक डिसीझ कंट्रोल), स्वीडन (कॅरोलिन्स्का इन्स्टिट्यूट), अमेरिका (हार्वर्ड युनिव्हर्सिटी, बोस्टन युनिव्हर्सिटी) इत्यादी शैक्षणिक संस्थांमधील विविध संशोधकांनी हा अभ्यास केला आहे.

अभ्यासातील ठळक निष्कर्ष
१. सर्व दहा शहरांमध्ये अभ्यास कालावधीत झालेल्या ७.२ टक्के मृत्यूंचा (दरवर्षी ३३ हजार) संबंध जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक मानकांपेक्षा अधिक असलेल्या पीएम २.५ च्या पातळीशी येणाऱ्या अल्पकालीन संपर्काशी जोडता येऊ शकतो.
२. पीएम २.५ मध्ये होणारी वाढ आणि अशा हवेशी येणारा अल्पकालीन संपर्क याचा रोजच्या मृत्यूंमध्ये झालेल्या १.४२ टक्के वाढीशी संबंध होता. जेव्हा हवा प्रदूषणाच्या स्थानिक परिणामांना वेगळे करणारी कॉझल मॉडेलिंगची पद्धत वापरली तेव्हा हेच प्रमाण जवळपास दुप्पट होऊन ३.५७ टक्के होत असल्याचे निदर्शनास आले.
३. पीएम २.५ चे कॉन्सट्रेशन कमी असताना मृत्यू जोखमीच्या वाढीचे प्रमाण चढे असते, तर उच्च असताना वाढीचे प्रमाण कमी होत जाते. त्याचबरोबर सद्यस्थितीतील परिसरातील राष्ट्रीय हवा गुणवत्ता मानांकनानुसार २४ तासांत पीएम २.५ चे प्रमाण कमी असताना मृत्यू जोखमीचा प्रभाव लक्षणीय असल्याचे आढळले.

या उपाययोजना आवश्यक :
१. सध्याच्या नॉन-अटेनमेंट शहरांपलीकडे जाऊन उपाययोजनांची व्याप्ती विस्तारण्याची आवश्यकता या अभ्यासातून दिसून येते.
२. काही वेळा उपाययोजना करण्यापेक्षा वर्षभर कार्यवाही करणे आवश्यक आहे.
३. हवा प्रदूषणाच्या विविध स्थानिक स्रोतांवर अधिक चांगल्या प्रकारे नियंत्रण ठेवण्यासाठी धोरणात्मक साधने विकसित करणे आवश्यक आहे.

हवेचे प्रदूषण कमी करणे हे देशपातळीवरील आव्हान आहे. कमी प्रदूषित समजल्या जाणाऱ्या शहरांमध्ये होणाऱ्या मृत्यूंसाठी हवा प्रदूषण हे एक महत्त्वाचे कारण आहे. संपूर्ण देशभर वर्षभर कठोर उपाययोजना करणे आवश्यक आहे.
- डॉ. भार्गव कृष्णा,
अभ्यासाचे प्रमुख लेखक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com