मुंबई विद्यापीठ पश्चिम विभागीय उपकरण केंद्राकडून ऑन जॉब ट्रेनिंग

मुंबई विद्यापीठ पश्चिम विभागीय उपकरण केंद्राकडून ऑन जॉब ट्रेनिंग

मुंबई विद्यापीठ पश्चिम विभागीय उपकरण केंद्राकडून ऑन जॉब ट्रेनिंग
विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांना संधी
मुंबई, ता. ८ : विद्यापीठ अनुदान आयोग आणि मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई विद्यापीठात स्थापित असलेल्या पश्चिम विभागीय उपकरण केंद्रात आता विद्यार्थ्यांना ऑन जॉब ट्रेनिंग घेता येणार आहे.
विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेतील विविध पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रविष्ट असलेल्या विद्यार्थ्यांना या केंद्रात अनुभवाधारित शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने शिकतानाच विद्यार्थ्यांना विषयाचे प्रात्यक्षिक ज्ञान, कौशल्ये आणि उद्योन्मुख क्षेत्रातील गरजा व संधीनुसार प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात येत आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या या राष्ट्रीय सुविधा केंद्राला शिक्षक आणि प्रयोगशाळेसंबंधित कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचा मोठा अनुभव असून आता विद्यार्थ्यांसाठी विविध अभ्यासक्रमांची रचना करण्यात आली आहे.
पहिल्या बॅचच्या विद्यार्थ्यांचा मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे ऑन जॉब ट्रेनिंगमुळे विद्यार्थ्यांमधील मनोबल वाढले असल्याचे या केंद्राचे संचालक प्रा. शिवराम गर्जे यांनी सांगितले. विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागातील प्रथम वर्षाचे विद्यार्थी पश्चिम विभागीय उपकरण केंद्राबरोबरच ठाणे येथील ‘इंडियन रबर मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन’ या नामांकित संस्थेमध्ये ऑन जॉब ट्रेनिंगअंतर्गत प्रशिक्षण घेत आहेत. दोन्ही ठिकाणी मिळत असलेल्या प्रत्यक्ष व अनुभवधारित प्रशिक्षणामुळे विद्यार्थी समाधान व्यक्त करीत असून अशा प्रशिक्षणामुळे आत्मविश्वास वाढल्याचे विद्यार्थी सांगत आहेत.

या उपकरणांचे प्रशिक्षण
१२० तासांच्या या कार्यांतर्गत प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना ऑप्टिकल मायक्रोस्कोप, अणू शोषण स्पेक्ट्रो फोटोमीटर, यूव्ही-व्हीआयएस स्पेक्ट्रो फोटोमीटर, इन्फ्रारेड स्पेक्ट्रो फोटोमीटर, क्रोमॅटोग्राफी उपकरणे, संगणक देखभाल, इन्स्ट्रुमेंट कॅलिब्रेशन, ग्लास ब्लॉविंग अशा उपकरणांचे प्रशिक्षण, देखभाल व दुरुस्तीचे शिक्षण मिळणार आहे. विज्ञान शाखेतील एमएस्सी सत्र-२ आणि अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थी या प्रशिक्षणासाठी प्रविष्ट होऊ शकतील.

या अभ्यासक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये कौशल्यवृद्धीस हातभार लागणार आहे. रोजगारक्षमता आणि नोकरीच्या विविध संधी उपलब्ध होऊ शकतील.
-प्रा. शिवराम गर्जे, केंद्र संचालक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com