फाशी नको,त्यालाही तसेच फरफटत न्या..." पीडीत प्रदिप नाखवा यांची मागणी

फाशी नको,त्यालाही तसेच फरफटत न्या..." पीडीत प्रदिप नाखवा यांची मागणी

Published on

फाशी नको, त्यालाही तसेच फरपटत न्या
पीडित प्रदीप नाखवा यांची मागणी

मिलिंद तांबे ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : नेहमीप्रमाणे जेवणासाठी मासे घेऊन आम्ही दोघे नवरा-बायको आमच्या स्कुटीने घराकडे चाललो होतो. दोन मिनिटांत घरी पोचणार होतो. तेवढ्यात आमच्या स्कुटीला जोरदार धडक बसली. मी गाडीला धडकून डाव्या बाजूला कोसळलो; तर माझी पत्नी कावेरी ही गाडीचे बोनेट आणि टायरच्या मध्ये अडकली. कावेरी त्याला गाडी थांबवण्यासाठी जोरजोरात ओरडत होती; पण त्याने काहीही ऐकले नाही. मी उठलो. गाडीवर हाताने जोरजोरात ठोकत थांबण्यास सांगितले; पण गाडी सुसाट गेली. त्यासोबत माझ्या पत्नीलाही पाच किलोमीटर फरपटत नेले, त्यामुळेच तिचा जीव गेला. मिहीर शहा हाच त्या वेळी गाडी चालवत होता. त्यानेच माझ्या पत्नीचा जीव घेतला. त्यालाही तीच शिक्षा मिळाली पाहिजे. त्याला फाशी नको, त्यालाही पाच किलोमीटर फरपटत न्या, अशी संतप्त भावना मृत कावेरी यांचे पती प्रदीप नाखवा यांनी डबडबत्या डोळ्यांतील अश्रू पुसत व्यक्त केल्या.

प्रदीप नाखवा हे वरळी कोळीवाडा येथील तरे गल्लीत राहतात. ते आणि त्यांची पत्नी कावेरी यांना अमृता (वय २४) आणि यश (वय १९) ही दोन मुले आहेत. दोघेही नुकतेच खासगी कंपनीत नोकरीला लागले. प्रदीप आणि कावेरी नाखवा हे पारंपरिक मच्छीमार कुटुंब. त्यावरच ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. आपल्या पोटाला चिमटा घेऊन त्यांनी मुलांना शिक्षण दिले. त्यांच्या स्वतःच्या छोट्या होड्या असून प्रदीप स्वतः त्या चालवून मच्छीमारी करतात. त्यात कावेरी त्यांना मदत करत घरची जबाबदारीही सांभाळत होत्या.

सध्या पावसाळा सुरू असून मच्छीमारीवर बंदी आहे. यामुळे प्रदीप आणि कावेरी क्रॉफर्ड मार्केट, कुलाबा, ससून डॉक आदी ठिकाणांहून मच्छी आणून विकत होते. रविवारी पहाटेदेखील ते दोघे आपल्या स्कुटीवरून मच्छी घेऊन येत असताना अपघात झाला. हा प्रसंग आठवला की प्रदीप आजही धाय मोकलून रडतात. तीन दिवसांनंतरही पोलिस सीसीटीव्ही फुटेज दाखवत नाहीत. मी सर्व डोळ्यांनी पाहिले आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर कडक कारवाई करावी, अशी हात जोडून ते विनवणीही करत आहेत.

आपल्याला सोडून गेलेल्या आईविषयी सांगताना त्यांची मुले अमृता आणि यश यांनाही काही सुचत नव्हतं. ‘‘माझ्या आईला थोडे खरचटले तरी तिला सहन होत नव्हते. याने तर तिला आपल्या गाडीखाली फरपटत नेले. तिला किती यातना झाल्या असतील. अशा यातना आरोपीलाही व्हायला हव्यात. त्याला आमच्या ताब्यात द्या,’’ अशा संतप्त भावना कावेरी यांची मुलगी अमृताने व्यक्त केल्या. कावेरी यांचा मुलगा यश यानेही सरकार आणि पोलिस प्रशासनाबद्दल आपली नाराजी व्यक्त केली. यांच्याकडून संथ गतीने संपूर्ण प्रकरण हाताळले जातेय. आम्ही गरीब कुटुंब असल्याने आमचा आवाज कुणी ऐकायला तयार नाही; मात्र आम्हाला न्याय मिळाला नाही, तर आम्ही आईच्या न्यायासाठी रस्त्यावर उतरू, असा इशाराही त्याने दिला.

..
लाडक्या बहिणीला न्याय कधी?
कावेरी यांची बहीण रिना डबरी यांनीही राज्य सरकारवर आगपाखड केली. मुख्यमंत्र्यांनी नुकतीच लाडकी बहीण योजना जाहीर केली; पण त्यांच्या या अपघातात गेलेल्या बहिणीला ते कधी न्याय देतील, असा सवाल त्यांनी विचारला. गरीब घरातील व्यक्ती गेली म्हणून सरकारमधील कुणीही इकडे फिरकले नाही. छोट्या-मोठ्या घटनेत प्रत्येकाच्या घरी जाणारे मुख्यमंत्री जवळ असून आले नाहीत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर या प्रकरणाचा साधा उल्लेखही केला नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या सर्व आमदार-खासदारांना घेऊन सिद्धिविनायकाच्या दर्शनाला येऊन गेले; पण येथे आले नाहीत. अशा राजकारण्यांकडून न्यायाची काय अपेक्षा करणार, असा संतप्त सवालही रिना डबरी यांनी विचारला.


आधारच हरपला
मृत कावेरी यांचे वडील केसरीनाथ वाडकर हे ८०; तर आई भारती या ७० वर्षांच्या आहेत. आपल्या मुलीच्या अकाली जाण्याने त्यांनाही जबर धक्का बसला आहे. ते रात्रं-दिवस तिच्या तसबिरीसमोर बसून अश्रू गाळत आहेत. त्यांनाही वार्धक्यात आपल्या मुलीचा मोठा आधार होता. तो आधारच नाहीसा झाला आहे. आपल्या मुलीला तडफडत मारणाऱ्या आरोपीला कडक शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी कापऱ्या आवाजात केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.