

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणाचे वार्तांकन करणाऱ्या ‘सकाळ’च्या महिला पत्रकाराविरुद्ध अर्वाच्य भाषेत टिप्पणी केल्याप्रकरणी माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी अटक टाळण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणात २९ ऑगस्टपर्यंत कारवाई करणार नसल्याची तोंडी हमी पोलिसांनी मंगळवारी उच्च न्यायालयाला दिली आहे, मात्र आदेशात याची नोंद करण्यास नकार देत म्हात्रेंची याचिका न्यायालयाने निकाली काढली.
बदलापूर घटनेनंतर लोकांनी केलेल्या आंदोलनाचे वार्तांकन करण्यासाठी जाणाऱ्या ''सकाळ''च्या स्थानिक महिला पत्रकाराला वामन म्हात्रे यांनी अर्वाच्य भाषेत जाब विचारला होता. याप्रकरणी महिला पत्रकाराने बदलापूर पूर्व पोलिस ठाण्यात म्हात्रे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली, मात्र पोलिसांनी त्या दिवशी तक्रार नोंदवली नसल्याने विविध राजकीय पक्षांकडून आवाज उठवला गेल्यानंतर २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता ॲट्रॉसिटीअंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, याप्रकरणी आपल्याला अटक होऊ नये, यासाठी वामन म्हात्रे यांनी उच्च न्यायालयात अपील केले होते. त्यांच्या अपील अर्जावर आज (ता. २७) न्या. संदीप मारणे यांच्या एकल पीठासमोर सुनावणी झाली. त्या वेळी कनिष्ठ न्यायालयात याप्रकरणी सुनावणी सुरू असल्याची माहिती वकिलांकडून देण्यात आली, तसेच तक्रारदार पत्रकाराने म्हात्रे यांच्या अर्जाला उत्तर देण्यासाठी २९ ऑगस्टपर्यंत मुदत मागितल्याने सत्र न्यायालयाने सुनावणी तहकूब केली असून तोपर्यंत (अपीलकर्त्याला) काहीही होणार नाही, असे आश्वासन दिल्याचे सहायक सरकारी वकिलांनी न्या. मारणे यांना आज सांगितले. त्यामुळे म्हात्रे यांचा अर्ज सत्र न्यायाधीशांनी प्रलंबित ठेवला असून त्यावर २९ ऑगस्ट रोजी कायद्यानुसार निर्णय देण्याचे निर्देश न्यायमूर्तींनी दिले, तसेच म्हात्रे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जाबाबतचा अहवाल रजिस्ट्रीकडे सादर करण्यास सांगत सत्र न्यायाधीशांनी याचिका निकाली काढली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.