

लोकल अपघातात २० वर्षांत २३ हजार प्रवाशांचा मृत्यू
पश्चिम रेल्वेचे उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : मुंबईत लोकल अपघातात अनेक जण आपला जीव गमावतात. याच लोकल प्रवासात गेल्या २० वर्षांत २३ हजार २७ प्रवाशांचा मृत्यू झाला असून २६ हजार ५७२ प्रवासी जायबंदी झाले आहेत. हे अपघात रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून उच्च न्यायालयात देण्यात आली; तसे प्रतिज्ञापत्र न्यायालयात पश्चिम रेल्वेकडून सादर करण्यात आले.
लोकल ट्रेनमधील मृत्यू रोखण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी करीत यतीन जाधव यांनी ॲड. रोहन शहा यांच्यामार्फत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. गेल्या सुनावणीवेळी मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्या. अमित बोरकर यांच्या खंडपीठाने याबाबत प्रतिज्ञापत्राद्वारे भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश रेल्वे प्रशासनाला दिले होते. त्यानुसार पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त संतोषकुमार सिंह राठोड यांनी प्रतिज्ञापत्र दाखल केले. रेल्वेने यामध्ये म्हटले आहे की, अपघातांची संख्या कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत; हे याचिकाकर्त्यांचे म्हणणे चुकीचे आहे. वाहतुकीचे प्रमाण प्रचंड वाढले असतानाही अशा घटना कमी झाल्या आहेत. विविध उपाय तसेच लोकल सेवा विस्ताराद्वारे अपघात कमी करण्यासाठी सतत प्रयत्न केले जात आहेत, तसेच यापुढेदेखील केले जातील. सर्व पायाभूत सुविधा बळकट (जसे की अधिक एफओबी, आरओबी, फलाटाचे रुंदीकरण, वाढलेले रेक, ट्रॅक ओलांडण्याविरुद्ध कारवाई इ.) करून मृत्यू आणि दुखापतीच्या घटना गेल्या २० वर्षांत लक्षणीयरीत्या कमी झाल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.