राज्यात इन्फ्लूएंझाचे ४३ मृत्‍यू

राज्यात इन्फ्लूएंझाचे ४३ मृत्‍यू
Published on

राज्यात इन्फ्लूएंझाचे ४३ मृत्‍यू
गेल्या वर्षीच्या तुलनेत रुग्‍णांची ५० टक्के वाढ,
मुंबईत प्रमाण अधिक
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : राज्यात यंदा इन्फ्लूएंझा आजाराचा उद्रेक दिसून येत आहे. इन्फ्लूएंझा ए आणि स्वाइन फ्लूची लागण होऊन आतापर्यंत ४३ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी इन्फ्लूएंझाबाधितांच्या संख्येत ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत मुंबईत सर्वाधिक लोकांना संसर्ग झाला आहे.
आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, २०२४ मध्ये एक हजार २३१ जणांना इन्फ्लूएंझा आजाराची लागण झाली होती, तर यावर्षी बाधितांची संख्या एक हजार ८५१ वर पोहोचली आहे. २०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये या आजारामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या ४३ टक्क्यांनी वाढली आहे. याआधी २०२२ मध्ये इन्फ्लूएंझाची तीन हजार ७१४ प्रकरणे आढळून आली होती आणि २१५ संक्रमित लोकांना आपला जीव गमवावा लागला होता.
यावर्षी आढळून आलेल्या एक हजार ८५१ रुग्‍णांपैकी मुंबईत ५२३, पुण्यात ३१४, नाशिकमध्ये २५९, ठाण्यात २४८, कोल्हापुरात २१३ रुग्ण आढळले आहेत.

ओपीडीमध्ये येणाऱ्या रुग्णांपैकी केवळ १० टक्के रुग्णांनाच दाखल करावे लागते. निमोनिया केवळ एक टक्का विकसित होतो. दाखल केलेले बहुतांशी रुग्‍ण वृद्ध आणि सह-विकाराने ग्रस्त असतात.
- डॉ. नीरज तुलारा
संसर्गजन्य रोग विशेषज्ञ,
एलएच हिरानंदानी रुग्णालय

मास्‍क घाला!
आरोग्य विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, हा आजार टाळण्यासाठी मास्क घाला आणि वैयक्तिक स्वच्छतेकडे लक्ष द्या. बाहेरून आल्यानंतर हात धुवा. गर्दीच्या ठिकाणी मास्क लावा. लक्षणे दिसल्यास ताबडतोब सरकारी किंवा महापालिकेच्या रुग्णालयात जा आणि स्वतःची चाचणी करा. संसर्ग आढळल्यास इतरांच्या संपर्कात येऊ नका आणि तुम्ही बरे होईपर्यंत मास्क आणि अंतर पाळा.

लक्षणे ओळखा-
उच्च दर्जाचा ताप म्हणजे १०२ ते १०३ अंश सेल्सिअस, घशात दुखणे, २४ तासांच्या आत अशक्तपणा, सर्दीऐवजी खोकला ही स्वाइन फ्लू, एच ३ एन २ ची लक्षणे आहेत. यात सामान्य औषधेही काम करत नाहीत. वर नमूद केलेली लक्षणे २४ ते ४८ तास कायम राहिल्यास संसर्गजन्य रोगतज्ज्ञ किंवा चांगल्या वैद्याचा सल्ला घेणे चांगले.

आतापर्यंत १.७२ लाख लोकांची तपासणी -
राज्याच्या आरोग्य विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, यावर्षी आतापर्यंत १.७२ लाख लोकांची इन्फ्लूएंझा ए, स्वाइन फ्लू, एच ३ एन २ चाचणी करण्यात आली आहे. चार हजार ८९५ संशयित रुग्णांना ओसेल्टामीविर औषधाचा डोस देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com