शिक्षण उपसंचालकांचे कार्यालय नव्या जागेत
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद तसेच मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयांचे चर्नी रोड येथील मित्तल आयुर्वेदिक हॉस्पिटलच्या आठव्या ते दहावा मजल्यावर तात्पुरते स्थलांतर करण्यात आले आहे. शालेय शिक्षण आणि मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते या कार्यालयांचे उद्घाटन करण्यात आले.
महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद तसेच मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय असलेल्या जागेवर भव्य मराठी भाषा भवन उभारण्यात येणार आहे. लवकरच त्याचे भूमिपूजन होणार आहे. यासाठी या इमारतीमधील कार्यालयांचे तात्पुरते स्थलांतर करण्यात आले आहे. या कार्यालयांच्या उद्घाटनप्रसंगी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या राज्य प्रकल्प संचालक आर. विमला, शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव समीर सावंत, मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक संदीप संगवे आदी उपस्थित होते.
या कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी शालेय शिक्षणमंत्री केसरकर म्हणाले, ‘शालेय शिक्षण विभागामार्फत विद्यार्थी हिताचे विविध निर्णय घेण्यात आले आहेत. ‘समग्र शिक्षा’च्या माध्यमातून उत्कृष्ट तंत्रज्ञानाचा वापर करून दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जातो. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार व्यावसायिक शिक्षणावरही भर देण्यात येत आहे. जागतिक स्तरावर आवश्यक असणारे प्रशिक्षण देण्याचाही प्रयत्न आहे, याचाच एक भाग म्हणून पात्र आणि इच्छुक युवकांना जर्मनीतील बाडेन वुटेमबर्ग राज्यात रोजगार मिळवून देण्याची प्रक्रिया सुरू आहे.’
राज्य प्रकल्प संचालक आर. विमला यांनी प्रास्ताविक केले. या कार्यालयातून ‘समग्र शिक्षा’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचे काम अधिक जोमाने केले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विभागीय शिक्षण उपसंचालक संगवे यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याबद्दल शालेय शिक्षणमंत्री केसरकर यांचे अभिनंदन केले.
---
मराठी भाषा विभागामार्फत भाषा धोरण जाहीर झाले आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. मराठी भाषा भवनचे लवकरच भूमिपूजन होणार आहे. अधिकारी-कर्मचाऱ्यांना कार्यालयात उत्तम सोयी-सुविधा दिल्या जात आहेत. या कार्यालयांतून दर्जा उंचावणारे काम व्हावे.
- दीपक केसरकर, शालेय शिक्षणमंत्री
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

