

उल्हासनगरात गरब्याचा आवाज वाढला
उच्च न्यायालयात याचिका; कारवाईचे पोलिसांकडून आश्वासन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : उल्हासनगरात गरबा आयोजकांनी आवाजाची मर्यादित पातळी ओलांडल्याने याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायालयाने आज याचिकेची दखल घेतली. पुन्हा आवाजाची पातळी वाढल्यास आयोजकांवर योग्य कारवाई केली जाईल, अशी हमी यावेळी पोलिसांनी दिली.
उल्हासनगर येथे राहणाऱ्या सरिता खानचंदानी यांच्या कार्यालयाजवळच नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने गरबा आयोजित केला जातो; मात्र गरबा आयोजकांकडून आवाजाची पातळी ओलांडल्याने ध्वनिप्रदूषण होते; त्यामुळे या मंडळावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर शुक्रवारी (ता. ४) न्या. रेवती मोहिते डेरे आणि न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी राज्य सरकारच्या वतीने व्ही. बी. कोंडे देशमुख यांनी युक्तिवाद केला. त्यांनी खंडपीठाला सांगितले की, ‘पोलिसांनी संबंधित जागेवर जाऊन पाहणी केली असून त्या ठिकाणी नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई करण्यात येईल. याशिवाय ठाणे पोलिसांच्या विशेष शाखेच्या पोलिस उपायुक्तांनी २७ सप्टेंबर रोजी ध्वनिप्रदूषण नियमांशी संबंधित परिपत्रक जारी केले आहे. उल्हासनगरवासीयांमध्ये याबाबत जनजागृती व्हावी, यासाठी या परिपत्रकाची व्यापक प्रसिद्धी करण्यात येईल; याशिवाय टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देणारे नवे परिपत्रक प्राधिकरणाकडून जारी केले जाईल, जेणेकरून नागरिकांना असे प्रसंग उद्भवल्यास तक्रार करता येईल.’ दरम्यान, पालिकेच्या वकिलाने याचिकेला उत्तर देण्यासाठी खंडपीठाकडे वेळ मागितली असून खंडपीठाने वेळ देत सुनावणी ८ ऑक्टोबरपर्यंत तहकूब केली.
तत्परतेने कारवाई करू
उल्हासनगरात गरब्यात आवाजाची पातळी वाढल्याबाबत पोलिस आणि उल्हासनगर महापालिकेने आश्वासन दिले आहे की, जेव्हा याचिकाकर्त्या ध्वनिप्रदूषण नियमांच्या उल्लंघनाशी संबंधित कोणतीही तक्रार करतील तेव्हा ते तत्परतेने योग्य ती कारवाई करतील. याशिवाय याचिकाकर्त्याच्या कार्यालयाजवळ एक महिला हवालदार १२ तासांसाठी तैनात करण्यात आली असून ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन होऊ नये, म्हणून त्या हवालदाराकडे ध्वनी मोजणारे यंत्र देण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.