डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करा
डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करा!
राष्ट्रपतींकडे महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलची मागणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करा, अशी मागणी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे प्रशासक डॉ. विंकी रुघवानी यांनी केली आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट डॉ. रुघवानी यांनी डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्याची विनंती केली. कोलकाता बलात्कार प्रकरणानंतर आरोग्य यंत्रणेत काम करणाऱ्या मंडळींसाठी सुरक्षेचे उपाय वाढवण्यासाठी त्वरित कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. डॉ. रुघवानी यांनी देशभरातील आरोग्य कर्मचाऱ्यांना भेडसावणाऱ्या वाढत्या धोक्यांवर चर्चा केली. तसेच, डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना हिंसाचारापासून वाचवण्यासाठी कायदेशीर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली. यावर राष्ट्रपती मुर्मू यांनीही लोकांचे प्राण वाचवणाऱ्या डॉक्टरांवर होणारे हल्ले आणि महिला डॉक्टरांवर होत असलेले अमानुष कृत्य पाहता त्यांच्यासाठी अधिक चांगल्या सुरक्षेची गरज असल्याचे मान्य केले. दरम्यान, ऑल इंडिया मेडिकल स्टुडंट्स असोसिएशनच्या वतीने राष्ट्रीय निमंत्रक डॉ. अपूर्व दळवी आणि असोसिएशनच्या इतर सदस्यांनी सर्व वैद्यकीय विद्यार्थी आणि डॉक्टरांच्या वतीने डॉ. विंकी रुघवानी यांना पत्र सादर केले. महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलतर्फे महाराष्ट्रातील विविध वैद्यकीय महाविद्यालये आणि इतर रुग्णालयांमध्ये सध्या बाराशेहून अधिक परदेशी वैद्यकीय पदवीधरांची इंटर्नशिप सुरू आहे. यामध्ये सर्व इंटर्नशिप महाराष्ट्रासह इतर राज्यातील विद्यार्थी करत आहेत.
चौकट
जनजागृतीवर भर
देशातील थॅलेसेमिया आणि सिकलसेल रोग यासारख्या दुर्मिळ आजारांना तोंड देण्यासाठी प्रतिबंधात्मक कार्यक्रम राबवण्याची गरज आहे. या आजारांमध्ये लवकर वैद्यकीय हस्तक्षेप महत्त्वाचा असल्याचे डॉ. रुघवानी यांनी सांगितले. दुर्मिळ आजारांबद्दल आणि अशा परिस्थितीच्या व्यवस्थापनाबद्दल लोकांना शिक्षित करण्यासाठी जनजागृती कार्यक्रम आयोजित करणे महत्त्वाचे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

