रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर ‘जैसे थे’

रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर ‘जैसे थे’

Published on

रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर ‘जैसे थे’
मात्र भूमिका सौम्य केल्यामुळे समाधान

मुंबई, ता. ९ : रिझर्व्ह बँकेने आज सलग दहाव्यांदा रेपो व्याजदर तोच म्हणजे ६.५ टक्के एवढाच ठेवला. सवलती काढून घेण्याची याआधीची भूमिका बदलून आता तटस्थ भूमिका घेतल्याने भविष्यात मात्र व्याजदर कपात होण्याबाबत आशा व्यक्त केली जात आहे. या आर्थिक वर्षात जीडीपी वाढीचा अंदाज ७.२ टक्क्यांवर, तर चलनवाढीचा अंदाज ४.५ टक्क्यांवर स्थिर ठेवला आहे.
अमेरिकी फेडरल बँकेने नुकतीच अर्धा टक्का व्याजदर कपात केल्यामुळे त्यामागोमाग काही विकसित देशांच्या मध्यवर्ती बँकांनीही व्याजदरात कपात केली होती. त्यामुळे आता रिझर्व्ह बँकदेखील व्याजदर कपात करेल, अशी आशा सुरुवातीला व्यक्त केली जात होती; मात्र स्थिरावलेला जीडीपी आणि खरीप पिकांच्या उत्पादनाचा अद्यापही नीट अंदाज न आल्यामुळे रिझर्व्ह बँक ऑक्टोबरच्या बैठकीत व्याजदर कपात करणार नाही, असे मत तज्ज्ञांनी यापूर्वीच ‘सकाळ’कडे मांडले होते. त्यानुसार आज व्याजदर कपात केली नाही.
रिझर्व्ह बँकेच्या नव्याने तयार केलेल्या पतधोरण समितीची द्वैमासिक बैठक आज संपल्यावर त्यांच्या निर्णयांची माहिती गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिली. चलनवाढीची स्थिती अद्याप न सुधारल्याने व्याजदर मागच्या इतकेच ठेवण्याची भूमिका समितीने एकमताने घेतल्याचे ते म्हणाले. फेब्रुवारी २०२३पासून रिझर्व्ह बँकेने हेच व्याजदर कायम ठेवले आहेत. कोरोना काळात व्याजदर कपात करून सवलत दिल्यानंतर रिझर्व्ह बँकेने या सवलती काढून घेण्याची कठोर भूमिका घेत व्याजदर वाढवण्यास सुरुवात केली; मात्र आता पहिल्यांदाच रिझर्व्ह बँकेने तटस्थ भूमिका घेतल्याने पुढील बैठकीत व्याजदर कपात होईल, अशी अपेक्षा तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.
पावसाचा हंगाम संपल्यावर पाऊस, पाणीसाठा, पीक परिस्थिती आणि अन्न चलनवाढ यांचा आढावा घेऊनच रिझर्व्ह बँक डिसेंबर किंवा फेब्रुवारीच्या बैठकीत व्याजदर कपातीचा निर्णय घेऊ शकते, असे एचडीएफसी बँकेचे अभिक बारुआ यांनी सांगितले. रिझर्व्ह बँकेने आज स्टॅंडिंग डिपॉझिट फॅसिलिटी रेट (एसडीएफ) ६.२५ टक्क्यांवर आणि मार्जिनल स्टॅंडिंग फॅसिलिटी रेट (एमएसएफ), तसेच बँक रेटदेखील न बदलता ६.७५ टक्क्यांवर स्थिर ठेवले.
...
जीडीपी वाढीचा अंदाज स्थिर
रिझर्व्ह बँकेने या आर्थिक वर्षासाठी जीडीपी वाढीचा अंदाजही ७.२ टक्क्यांवर स्थिर ठेवला आहे. या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत म्हणजे जुलै ते सप्टेंबरमध्ये ही वाढ सात टक्के असेल. तिसऱ्या आणि चौथ्या तिमाहीत ती ७.४ टक्क्यांवर असेल, असा अंदाजही रिझर्व्ह बँकेने व्यक्त केला आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६च्या पहिल्या तिमाहीसाठी जीडीपी वाढीचा अंदाज ७.३ असा निश्चित करण्यात आला आहे.
...
चलनवाढही साडेचार टक्क्यांवर स्थिर
जीडीपी वाढीचा अंदाज स्थिर ठेवताना रिझर्व्ह बँकेने चलनवाढीचा अंदाजही या आर्थिक वर्षासाठी साडेचार टक्क्यांवर स्थिर ठेवला आहे. दुसऱ्या तिमाहीतील चलनवाढ ४.१ टक्के, तिसऱ्या तिमाहीतील चलनवाढ ४.८ टक्के, तर चौथ्या तिमाहीतील चलनवाढ ४.२ टक्के राहील, असा अंदाज आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६च्या पहिल्या तिमाहीत ही चलनवाढ ४.३ टक्के राहण्याचा रिझर्व्ह बँकेचा अंदाज आहे.
....
निश्चित केलेल्या चलनवाढ मर्यादेच्या आसपासच चलनवाढ नियंत्रित आहे; मात्र दरवाजे उघडण्यापूर्वी (व्याजदर कपातीचे) सावधगिरी बाळगली पाहिजे.
- शक्तिकांत दास, गव्हर्नर, रिझर्व्ह बँक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com