

आंतरजातीय, आंतरधर्मीय जोडप्यांसाठी
सुरक्षित घरांची संख्या किती?
- उच्च न्यायालयाची सरकारला विचारणा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : आंतरजातीय आणि आंतरधर्मीय जोडप्यांच्या लग्नानंतर त्यांच्यावर हल्ला होण्याचे प्रकार बरेच घडतात. त्या पार्श्वभूमीवर आंतरजातीय आणि आंतरधर्मीय जोडप्यांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक जिल्ह्यात स्थापन केलेल्या सुरक्षित घरांची संख्या किती आहे, तसेच किती ठिकाणी विशेष सेल स्थापन करण्यात आले आहेत, असा सवाल करत त्याबाबतची आकडेवारी उपलब्ध करून देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या २०१८ च्या शक्ती वाहिनी निकालानुसार संरक्षण आणि सुरक्षित निवासाची मागणी करणाऱ्या आंतरधर्मीय जोडप्याने गेल्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर न्या. रेवती मोहिते-डेरे आणि न्या. पृथ्वीराज के चव्हाण यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली.
राज्य सरकारच्या वतीने युक्तिवाद करताना ॲड. पी. पी. शिंदे यांनी आंतरधर्मीय जोडप्यांच्या सुरक्षेसाठी सर्वोच्च न्यायालयाने जारी केलेल्या निर्देशांच्या अंमलबजावणीसाठी गृहविभागाने यावर्षी १३ सप्टेंबर रोजी मार्गदर्शक तत्त्वे तयार केल्याचे सांगितले. या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये आंतरधर्मीय जोडप्यांच्या संरक्षणासाठी प्रत्येक जिल्ह्यात सुरक्षित घरे स्थापन करण्याची, तसेच प्रत्येक पोलिस आयुक्तालय आणि अधीक्षक क्षेत्रामध्ये स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली आणि जिल्हा समाज कल्याण अधिकारी व महिला, बालविकास अधिकाऱ्यांच्या सहाय्याने विशेष सेल तयार करण्याचे नमूद करण्यात आले आहे.
तपशील सादर करा
याचिकाकर्त्यांची बाजू मांडणारे, ज्येष्ठ वकील मिहिर देसाई यांनी सांगितले की, मार्गदर्शक तत्त्वे जारी करूनही, सरकारने प्रत्येक जिल्ह्यात स्थापन केलेल्या सुरक्षित घरांची संख्या आणि विशेष सेलची संख्या अद्याप जाहीर केलेली नाही. याची दखल घेत खंडपीठाने सरकारला २१ ऑक्टोबरपर्यंत तपशील सादर करण्यास सांगितले व सुनावणी तहकूब केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.