मुंबई विद्यापीठाच्या पेट परीक्षेत गोंधळ
मुंबई विद्यापीठाच्या पेट परीक्षेत गोंधळ
डोंबिवली केंद्रावरील परीक्षा रद्द
मुंबई, ता. १७ : मुंबई विद्यापीठाने आयोजित केलेल्या पीएचडी प्रवेश पात्रता परीक्षा (पेट) परीक्षेत परीक्षा घेणाऱ्या खासगी संस्थेकडून नीट नियोजन करण्यात आले नसल्याने २१ पैकी बहुतांश परीक्षा केंद्रांवर मोठ्या परीक्षा वेळेत सुरू होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे असंख्य उमेदवारांना त्याचा फटका बसला. डोंबिवली येथील एका परीक्षा केंद्रावर सकाळी १०.३० वाजता सुरू होणारा पेटचा आणि दुपारच्या सत्रातील एलएलएम प्रवेशपूर्व परीक्षेचा पेपर होऊ न शकला नसल्याने या केंद्रावरील परीक्षा रद्द करून ती पुढील आठवड्यात घेण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला आहे.
‘परीक्षा होऊ शकली नाही, त्याबाबत विद्यापीठ प्रशासन गंभीर आहे. नेमक्या त्रुटी काय राहिल्या यांची माहिती घेऊन त्यावर निश्चित योग्य कार्यवाही केली जाईल,’ अशी माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आली. डोंबिवली येथील सुरेखा सेंटर परीक्षा केंद्रावर तांत्रिक कारणामुळे न होऊ शकलेल्या पेट आणि एलएलएम परीक्षा फक्त याच केंद्रावरील परीक्षार्थींसाठी पुढील रविवारी (ता. २४) घेण्याचा निर्णय विद्यापीठामार्फत घेण्यात आला आहे. या विद्यार्थ्यांना परीक्षेचे ठिकाण आणि वेळ हे सुधारित प्रवेशपत्राच्या (हॉल तिकीट) माध्यमातून स्वतंत्ररीत्या लॉगिन ईमेलद्वारे कळविण्यात येणार असल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आले. सकाळच्या सत्रात आयोजित करण्यात आलेल्या पेट परीक्षेसाठी काही केंद्रांवर तांत्रिक कारणामुळे परीक्षा उशिरा सुरू झाली; मात्र कोणत्याही विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी विद्यार्थ्यांना त्यासाठी वाढीव वेळ देण्यात आला असल्याची माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली. पेट परीक्षेसाठी पाच हजार ५५४ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज केले होते. त्यापैकी तीन हजार ४६२ एवढ्या विद्यार्थ्यांनी आज परीक्षा दिली तर १,५६६ जणांनी परीक्षेला दांडी मारली आहे. दुसरीकडे एलएलएम प्रवेशपूर्व परीक्षेसाठी ५,०७७ एवढ्या विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी ३,६६१ एवढ्या विद्यार्थ्यांनी आज परीक्षा दिली तर ८९२ विद्यार्थी परीक्षेला गैरहजर होते. डोंबिवली केंद्रावरील तांत्रिक कारणामुळे ५२४ विद्यार्थ्यांची परीक्षा होऊ शकली नाही.
...
विद्यापीठाचे ज्या एजन्सीला या परीक्षा घेण्याचे काम दिले आहे, त्यांनी महाविद्यालयांव्यतिरिक्त कॉम्प्युटर क्लासेसमध्येदेखील परीक्षा घेतल्या. आज परीक्षा न झालेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढील आठवड्यात घेण्यात येणार आहेत. या प्रकाराची कसून चौकशी करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी आणि या भोंगळ कारभाराची नैतिक जबाबदारी परीक्षा प्रमुखांनी स्वीकारावी, तसेच विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी.
- प्रदीप सावंत, सिनेट सदस्य, युवासेनेचे पदाधिकारी
...
मुंबई विद्यापीठाच्या पीएचडी प्रवेश पात्रता परीक्षा (पेट) आणि विधीच्या एलएलएम (सीईटी) या दोन्ही पात्रता परीक्षा एकाच दिवशी घेण्यात विद्यापीठ प्रशासन असमर्थ ठरले आहे. परीक्षा देण्यास आलेल्या विद्यार्थ्यांची गत ‘अर्धे तुपाशी व अर्धे उपाशी’ अशी झाली असून ज्या विद्यार्थ्यांना आज त्रास सोसावा लागला, त्यांना न्याय देण्याची मागणी आम्ही केली आहे.
- संतोष गांगुर्डे, मुख्य समन्वयक, मनविसे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

