नव्या वर्षात दोन नव्या लोकल गाड्या

नव्या वर्षात दोन नव्या लोकल गाड्या
Published on

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : मध्य रेल्वेच्या नेरूळ-बेलापूर ते उरण विभागात धावणाऱ्या जुन्या रेट्रो फिट लोकल इतिहासजमा होणार आहे. त्याजागी दोन नॉन एसी लोकल चालविण्यात येणार आहेत. नुकताच मध्य रेल्वेच्या ताफ्यात दोन नव्या नॉन एसी लोकल दाखल झाल्या असून त्याच्या चाचण्या घेण्यात येत आहेत. यामुळे नवीन वर्षात नेरूळ-बेलापूर ते उरण मार्गावर नव्या लोकल धावणार असून प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
नवी मुंबईचा विकास गेल्या काही वर्षांपासून झपाट्याने होत आहे. अनेक कॉर्पोरेट कार्यालये, उद्योग आणि व्यवसाय सुरू झाले आहेत. त्यामुळे येथील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत जात आहे. त्यामुळे हार्बर आणि ट्रान्सहार्बर मार्गावरील धावणाऱ्या लोकलवर प्रवाशांचा ताण येत आहे. मुंबई आणि नवी मुंबईदरम्यान धावणाऱ्या हार्बर मार्गावरून सुमारे बारा ते पंधरा लाख प्रवासी रोज प्रवास करतात; तर ठाणे आणि नवी मुंबई स्थानकांना जोडणाऱ्या ट्रान्स हार्बर मार्गावरील प्रवासी संख्येत दिवसेंदिवस भर पडत आहे. याशिवाय नेरूळ-बेलापूर ते उरण मार्गावरील प्रवाशांची संख्या प्रचंड वाढली आहे; परंतु अपुऱ्या लोकल फेऱ्या आणि जुनाट गाड्यांमुळे हार्बरवासीयांना अनेक समस्यांचा समान करावा लागत आहे. मध्य रेल्वेच्या बेलापूर-नेरूळ ते उरण पोर्ट मार्गावर दररोज रेट्रोफिट तीन आणि सिमेन्स लोकलची एक अशा चार लोकलच्या ४० फेऱ्या होत्या. यातील काही रेट्रो फिट लोकल गाड्यांचे आयुर्मान संपत आले आहे. त्यामुळे या मार्गावर नवीन कोऱ्या नॉन एसी लोकल धावणार आहेत.
---------------
आयुर्मान संपले
रेट्रो फिट लोकल या जुनाट पद्धतीच्या असून त्यांचा वेग कमी आहे. तसेच, या गाड्यांमधील आसनव्यवस्था, प्रकाश योजना, अंतर्गत जागा कमी असल्याने प्रवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. या मार्गावर धावणाऱ्या रेट्रो फिट गाड्या २०१६ ते २०१९मध्ये रेट्रो फिट केलेल्या आहेत. एका लोकलचे आयुर्मान २५ वर्षे असते. त्यानंतर त्या गाड्या भंगारात काढल्या जातात.
-----------------
दोन नवीन साध्या गाड्या ताफ्यात
मध्य रेल्वेच्या ताफ्यात दोन नॉन एसी लोकल गाड्या दाखल झालेल्या आहेत. दोन्ही लोकल चेन्नईच्या इंटेग्रल कोचिंग कारखान्यात बांधण्यात आल्या आहेत आहे. या दोन लोकलपैकी एका लोकलची चाचणी सुरू आहे; तर दुसऱ्या गाडीची चाचणी लवकरच सुरू करण्यात येणार आहे. सध्या या गाड्या कळवा कारशेडमध्ये आहेत.
----------
लोकल फेऱ्यांचे गणित
सध्या मध्य रेल्वेच्या ताफ्यात १६० लोकल गाड्या असून दररोज १३६ गाड्या धावतात. दररोज या गाड्यांच्या एक हजार ८१० फेऱ्या होतात. ज्यामध्ये मेन लाइनवर ८९४, हार्बर मार्गावर ६१४, ट्रान्सहार्बर मार्गावर २६२ आणि नेरूळ बेलापूर-उरण विभागात ४० लोकल फेऱ्या दररोज धावत आहेत.
---------
मध्य रेल्वेची गाड्यांची स्थिती
लोकलचा प्रकार एकूण गाड्या डबे
एसी ५ १२
रेट्रो ३ १२
मेधा ४ १२
बम्बार्डियर ३० १२
सिमेन्स ९४ १२
सिमेन्स २ १५
------------
नवीन गाडीची वैशिष्ट्ये
- हवेशीर आणि आरामदायी
- सर्व डब्यांमध्ये एलईडी लाइट्स
- स्टेनलेस स्टील सीट्स
- सर्व पंख्यांना स्टेनलेस स्टीलची जाळी
- मोठी आसने
- मधल्या भागात अधिक जागा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com