शहरात महिला अत्याचाराचा आलेख चढाच
शहरात महिला अत्याचाराचा आलेख चढता
मुंबई, ता. ११ : महिलांवरील अत्याचाराचा आलेख यावर्षीदेखील चढता राहिला आहे. जनक्षोभ, पोलिस कारवाई आणि न्यायालयाकडून जाहीर होणाऱ्या शिक्षेचा धाक अल्पवयीन बालके आणि महिलांवर हात टाकणाऱ्या गुन्हेगारांना राहिलेला नाही. असेच चित्र पोलिस दफ्तरी नोंद असलेल्या आकडेवारीवरून दिसत आहे. यावर्षी पहिल्या १० महिन्यांत अर्थात ऑक्टोबरर्यंत शहराच्या विविध पोलिस ठाण्यांत दिवसाला २० या सरासरीने एकूण ५,९७९ गुन्हे नोंद झाले आहेत. मागील वर्षी ऑक्टोबरपर्यंत ५,३९८ गुन्हे नोंद होते. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत यंदा ५८१ गुन्हे वाढले आहेत.
यंदाच्या वर्षी दाखल एकूण गुन्ह्यांमध्ये सर्वाधिक गुन्हे महिलांच्या विनयभंगाचे (२,०६४) आणि अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचे (१,०१७) आहेत. गेल्या वर्षातील तुलनात्मक आकडेवारी पाहिल्यास हुंड्यासाठी मानसिक, शारीरिक छळ निम्म्याने कमी झाला. इतकी जमेची बाब सोडल्यास उर्वरित सर्व प्रकारांतील गुन्हे वाढले आहेत.
तुलनात्मक आकडेवारी
गुन्ह्याचे प्रकार २,०२३ २,०२४
अल्पवयीन बालकांवरील बलात्कार ४९० ५१४
प्रौढ महिलांवरील बलात्कार ३२४ ३५५
अल्पवयीन मुलींचे अपहरण ९८८ १०१७
प्रौढ महिलांचे अपहरण १० ४
अल्पवयीन मुलींचा विनयभंग ४९० ५१४
अल्पवयीन मुलींची छेडछाड १५ ३१
अल्पवयीन मुलींना वेश्याव्यवसायात
ढकलणे ० ३
महिलांचा विनयभंग १,७८३ २,०६४
हुंड्यासाठी हत्या ० १
हत्या १५ २०
मानसिक, शारीरिक छळ १३९ ३७०
...तरीही गुन्हांच्या संख्येत वाढ
महिलाविरोधी गुन्ह्याची तक्रार प्राप्त होताच पोलिस प्राधान्याने ती नोंदवून घेतात. आरोपींना तत्काळ अटक करून पुरावे गोळा करून न्यायालयात खटला दखल करतात. अल्पवयीन मुलांवरील अत्याचाराच्या खटल्यांची सुनावणी वेगाने व्हावी, यासाठी विशेष न्यायालये स्थापन केली आहेत. दिवसागणिक या न्याय दालनांमध्ये अनेक खटल्यांची सुनावणी होते. प्रत्येक न्याय दालनात किमान एका खटल्याचा निकाल लागतो, आरोपीला शिक्षा ठोठावली जाते. याशिवाय मुंबई पोलिसांनी महिला अत्याचाराच्या घटना घडू नयेत, यासाठी विविध पातळ्यांवर प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत. प्रत्येक वस्तीत गस्त घालण्याव्यतिरिक्त महिलांना, अल्पवयीन मुलींना सतर्क ठेवणे, शिक्षित करणे, काही प्रसंग घडल्यास त्वरित मदत मिळावी, या उद्देशाने पोलिसांनी प्रत्येक पोलिस ठाण्यात निर्भया पथक, पोलिस दीदी योजना सुरू केल्या आहेत. पोलिसांनी प्रत्येक शाळा, महाविद्यालयांत तक्रार पेटी ठेवण्यास सुरुवात केली. या पार्श्वभूमीवर घडलेले बहुतांश गुन्हे पोलिस ठाण्यात नोंद होतात. आरोपी पकडले जातात. त्यांना शिक्षाही होते; मात्र गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक निर्माण होत नसल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

