अपघातामागे काही कारण वा हेतू होता?
अपघातामागे अन्य काही कारण वा हेतू?
पोलिसांना हवा हिशेब; चालकाची होणार सखोल चौकशी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ ः कुर्ला अपघात प्रकरणात केवळ बस अनियंत्रित झाल्याने अपघात झाल्याचे कारण पोलिसांना तार्किकदृष्ट्या पटलेले नाही. अपघातामागे वेगळे कारण किंवा हेतू असावा, या दृष्टिकोनातून पोलिसांनी तपास सुरू र्-३केला आहे. त्यासाठी आरोपी बसचालक संजय मोरे (वय ५४) याने अपघातापूर्वी किती तास, किती किलोमीटर इलेक्ट्रिक बस चालवली, ही बस चालवण्याचे प्रशिक्षण याबाबतचा हिशेब पोलिसांनी बेस्टकडे मागितला आहे.
अपघातानंतर पोलिसांनी चालक मोरे यास अटक केली आहे. बस अनियंत्रित झाल्याने अपघात झाला, हे एकच कारण मोरे चौकशीदरम्यान सांगत असल्याचे पोलिस उपायुक्त गणेश गावडे यांनी सांगितले. बस का आणि कशी अनियंत्रित झाली, ती नियंत्रणात आणण्यासाठी काय उपाय केले, याबाबत तो काहीच बोलत नाही. विशेष म्हणजे, प्रत्यक्ष इलेक्ट्रिक बस चालवण्याचे एकच दिवस, तेही तीन फेऱ्यांचे प्रशिक्षण मिळाल्याचे मोरे याने सांगितले. त्यास ३० वर्षांहून अधिक काळ बस चालविण्याचा अनुभव आहे. आजतागायत त्याला कधीही अपघात झाला नाही, अशीही माहिती पोलिसांना मिळाली आहे.
--
बेस्टकडे पोलिसांनी केली विचारणा
१. बसचालक मोरे हा २०२० पासून तो गिअरच्या छोट्या बेस्ट बस चालवत आहे. १ डिसेंबर रोजी त्याच्या हाती विनागिअरची मोठी इलेक्ट्रिक बस देण्यात आली. साप्ताहिक सुट्टीवगळता त्याने किमान आठ दिवस इलेक्ट्रिक बस चालवली.
२. अपघाताच्या दिवशी त्याची कुर्ला-अंधेरी मार्गावर तिसरी फेरी होती. हे अंतर जवळपास १०.५ किलोमीटर आहे. म्हणजे त्याने सोमवारी तीन फेऱ्यांमध्ये एकूण ४२ किमी, आठ दिवसांत किमान ४०० ते ५०० किमी बस चालविल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.
३. आठ दिवसांत मोरेकडून बस अनियंत्रित झाल्याची तक्रार प्राप्त झाली का, प्रत्यक्षात त्याने या कालावधीत किती तास व किती किमी बस चालवली, याची माहिती पोलिसांनी बेस्ट प्रशासनाकडे मागितली आहे.
४. प्रादेशिक परिवहन विभागाने बसचे ब्रेक सुस्थितीत होते, बसमध्ये कोणताही बिघाड नव्हता, असा प्राथमिक अंदाज दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर मोरेचा एकूण अनुभव लक्षात घेता बस अनियंत्रित झाल्याने इतका मोठा अपघात घडावा, हे तार्किकदृष्ट्या पटत नाही, असे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
----
अनेकांकडे होणार चौकशी
या अपघात नियोजित कटाचा भाग होता का, कोणाच्या सांगण्यावरून त्याने हा अपघात घडवला का, वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील घडामोडींचा ताण किंवा राग यातून हा अपघात घडला का, या दृष्टीने तपास केला जाणार असल्याचे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले. त्यासाठी त्याचे कुटुंबीय, सहकारी, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे चौकशी होण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

