फॅशन स्ट्रीटचा नविन आराखडा तयार

फॅशन स्ट्रीटचा नविन आराखडा तयार
Published on

फॅशन स्ट्रीटचा नवीन आराखडा तयार
१५ दिवसांत मंजुरी प्रक्रिया पूर्ण करणार; परदेशाच्या धर्तीवर विकास
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : चर्चगेट ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसदरम्यान असलेल्या फॅशन स्ट्रीटच्या कायापालटासाठी पलिकेने नवीन आराखडा तयार केला आहे. सल्लागाराच्या अहवालाच्या आधारे या प्रकल्पाला अंतिम स्वरूप देण्याचे काम पूर्ण झाले आहे. फॅशन स्ट्रीटला नवे रूप देण्यासाठी येत्या १५ दिवसांत निविदा प्रक्रियाही सुरू करणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त (शहर) अश्विनी जोशी यांनी दिली.
नवीन डिझाइनच्या कपड्यांसाठी फॅशन स्ट्रीट ही मुंबईतील तरुणांची पहिली पसंती आहे. केवळ सर्वसामान्यच नाही, तर मनोरंजन जगतातील अनेक तारकादेखील येथे खरेदी करतात. खरेदीसाठी मुंबईतील हे सर्वांत प्रसिद्ध ठिकाण बनले आहे. फॅशन स्ट्रीटला युरोपियन आणि सिंगापूर येथील फॅशन स्ट्रीटचे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तिथे दोन दुकाने समोरासमोर असून, त्यामध्ये अंतर असते. याच थीमवर मुंबईच्या फॅशन स्ट्रीटला नवा लूक देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. पर्यटनाच्या दृष्टीनेदेखील आराखडा तयार करण्यात आला असून, फॅशन स्ट्रीटला दिवे लावून आकर्षक बनवण्यात येणार आहे.
फॅशन स्ट्रीट येथे खरेदी करता करता खरेदीदारांना आझाद मैदानही दिसेल. त्यांना आवश्यक विविध सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार असून, यात आधुनिक सुविधांनी सुसज्ज स्वच्छतागृहे आणि फर्निचरची व्यवस्था यांचा समावेश आहे. फॅशन स्ट्रीटमध्ये २५० ते ३०० गाळे असून, त्यातील ११२ गाळे अधिकृत आहेत. त्यांना पैसे भरून गाळा नियमित करता येईल का, याचाही विचार केला जात आहे.
सध्या असलेले मार्केट दाटीवाटीने उभे आहे. त्याचा विकास करताना दुकानांचा आकार कसा वाढेल, ती मागे कशी नेता येतील, याचा विचार केला जाणार आहे. दोन ते तीन दुकानांमध्ये काही अंतर राखले जाईल.
संकुलात खरेदीदारांना काय सुविधा देता येतील, याचा आराखडा तयार केला जात आहे. फॅशन स्ट्रीटच्या सुरक्षेवर भर दिला जात आहे. येथे कपडे, शूज, घड्याळे आणि इतर फॅशनेबल वस्तू मोठ्या प्रमाणात मिळतात, मात्र पदपथांची दुरवस्था आणि सुविधांचा अभाव यामुळे खरेदीदारांची अडचण होते. दुकानांच्या सुरक्षेबरोबरच महिलांसाठी प्रसाधनगृहाची व्यवस्थाही केली जाणार आहे, शिवाय ग्राहकांच्या अहाराची, पिण्याच्या पाण्याची आणि बैठकीची व्यवस्थाही केली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com