ओबीसी, एनटी विद्यार्थ्यांना पीएचडी फेलोशीपच्या पैशांची प्रतीक्षा

ओबीसी, एनटी विद्यार्थ्यांना पीएचडी फेलोशीपच्या पैशांची प्रतीक्षा

Published on

ओबीसी, एनटी विद्यार्थ्यांना पीएचडी फेलोशिपच्या पैशांची प्रतीक्षा
अन्याय दूर करण्याची मागणी; आंदोलनाचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ ः महाज्योतीमध्ये पीएचडी नोंदणी केलेल्या भटके-विमुक्त, ओबीसी, एसबीसीचे विद्यार्थी गेल्या दोन वर्षांपासून फेलोशिपचे पैसे मिळण्याची वाट पाहत आहेत. बार्टी, सारथी या संस्थेसोबत नोंदणी केलेल्या पीएचडी विद्यार्थ्यांना मात्र फेलोशिपचे पैसे मिळाल्याची तक्रार या विद्यार्थ्यांनी केली आहे. २५ जुलै २०२४ रोजी फेलोशिप देण्याचा निर्णय झाला होता, मात्र अजूनही पैस मिळालेले नाहीत. मंत्र्याकडून उडवाउडवीचे उत्तर मिळत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. बुधवारी (ता. १९) आंदोलन करण्याचा इशारा या विद्यार्थ्यांनी दिला आहे.
भारती नाईक या इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नालॉजीमध्ये पीएचडी करीत आहेत. २०२२मध्ये महाज्योती संस्थेत त्यांनी पीएचडीसाठी नोंदणी केली. दोन वर्षे लोटून गेले, पण भारती यांना अजूनही फेलोशिपचे पैसे मिळाले नाहीत. यूजीसीच्या नियमानुसार पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना महिन्याला ३७ हजार रुपये छात्रवृत्ती मिळते. पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सरासरी वार्षिक खर्च ८० हजार ते एक लाख रुपये एवढा येतो. म्हणजे पाच वर्षांचा खर्च ५ लाखांवर जातो. पीएचडी संशोधनासाठी आतापर्यंत भारती यांनी पदरचे चार लाख रुपये खर्च केले आहेत. यामध्ये प्रवेश शुल्क ८५ हजार रुपये, राहण्या-खाण्याच्या खर्चाचा समावेश आहे. भारती यांनी महाज्योतीच्या अधिकाऱ्यांकडे फेलोशिपचा पाठपुरावा केला असता, अर्थ खात्याकडे निधीची मागणी केली असून पैसे मिळाल्‍यानंतर तुम्हाला कळवू, असे उत्तर मिळाले. भारती यांच्याप्रमाणे राज्यभरातून पीएचडीची नोंदणी केलेल्या ९०० विद्यार्थ्यांना फेलोशिपचे पैसे मिळालेले नाहीत.
राज्यात अनुसूचित जाती, भटके विमुक्त, ओबीसी, एसबीसी व अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी बार्टी, सारथी आणि महाज्योती या तीन प्रमुख संस्था कार्यरत आहेत. मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार २३ सप्टेंबर २०२४ पासून या संस्थांमध्ये नोंदणी असलेल्या पीएचडीच्या विद्यार्थ्यांना १०० टक्के फेलोशिप मंजूर करण्यात आली होती. बार्टी आणि सारथी या संस्थांतील विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून फेलोशिप देण्यास सुरुवात झाली; मात्र महाज्योती संस्थेने २५ जुलै २०२४ पासून फेलोशिप देण्याचा निर्णय घेतल्याने महाज्योतीतील विद्यार्थ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. पैसेही वेळेवर मिळत नसल्यामुळे विद्यार्थ्यांपुढे पीएचडीचे संशोधन कसे सुरू ठेवायचे, असा प्रश्‍न उभा राहिला आहे.
विद्यार्थ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन २०२२ पासून मिळणारे फेलोशिपचे पैसे एकरकमी मिळावे, अशी मागणी केली. मात्र अजित पवार यांनी नकार देत संबंधित खात्याचे मंत्री अतुल सावे यांना भेटण्याची सूचना केल्याचे या विद्यार्थ्यांनी सांगितले.

बार्टी व सारथी संस्थांप्रमाणेच महाज्योती संस्थेतील ओबीसी, भटक्या विमुक्त आणि एसबीसी विद्यार्थ्यांनाही समान हक्क मिळावा आणि प्रलंबित असलेली अधिछात्रवृत्ती तातडीने अदा करण्यात यावी.
- संदीप आखाडे, पीचडी विद्यार्थी

या विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही. काही तांत्रिक अडचणी होत्या, त्या दूर झाल्या असून या आठवड्यापासून विद्यार्थ्यांना पैसे मिळायला सुरुवात होईल.
- अतुल सावे, मंत्री, ओबीसी कल्याण

महाज्योती संस्थेने २५ जुलै २०२४ पासून फेलोशिप देण्याचा निर्णय घेतल्याने महाज्योतीतील विद्यार्थ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.
- लक्ष्मी गोवेकर, पीएचडी विद्यार्थी

निवडणुकांच्या तोंडावर तिन्ही संस्थांना फेलोशिप देण्याचा निर्णय घेतला. आता काही निवडणुका नाहीत. त्‍यामुळे आम्‍हाला फेलोशिपचे पैसे देण्यास सरकार उशीर करीत आहे.
- ठकू पुजारी, विद्यार्थिनी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com