म्हाडा रखलेल्या १७ एसआरए प्रकल्पांना देणार गती

म्हाडा रखलेल्या १७ एसआरए प्रकल्पांना देणार गती

Published on

म्हाडा रखडलेल्या १७ एसआरए प्रकल्पांना देणार गती
२५ हजार अतिरिक्त घरे उपलब्ध होणार; पात्रता निश्चिती, प्रशासकीय मान्यता, निविदा प्रक्रिया लवकरच
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : म्हाडाच्या जमिनीवरील रखडलेल्या १७ एसआरए प्रकल्पांना आता म्हाडा गती देणार आहे. एसआरए प्राधिकरणाशी समन्वय साधून झोपडीधारकांची पात्रता निश्चिती करणे, प्रशासकीय मान्यता घेणे, निविदा प्रक्रिया राबवणे आदी कामे म्हाडाकडून केली जाणार आहेत. या पुनर्विकास प्रकल्पामुळे संबंधित झोपडीधारकांना हक्काचे घर मिळणार असून, म्हाडालाही जवळपास २५ हजार अतिरिक्त घरे उपलब्ध होऊ शकणार आहेत.
मुंबई महानगर प्रदेशातील रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांना चालना मिळावी, यासाठी रखडलेल्या १७ प्रकल्पांचा पुनर्विकास महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) व झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए) यांच्यामार्फत संयुक्त भागीदारी तत्त्वावर केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी सदर प्रकल्पांना चालना देण्याचे निर्देश म्हाडाच्या संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
म्हाडाच्या जागेवरील २१ एसआरए प्रकल्प रखडले आहेत. त्यापैकी आठ प्रकल्पांसंदर्भात झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने १३(२) अन्वये कारवाई करत सदर प्रकल्प मूळ विकसकांकडून काढून घेण्याची कारवाई केली आहे.

रखडलेले प्रकल्प
गोरेगाव विभाग - १२
वांद्रे विभाग - २
कुर्ला विभाग - ५
बोरिवली/दहिसर विभाग - २
रखडलेल्या या प्रकल्पांपैकी म्हाडा प्रथम १७ प्रकल्पाला गती देणार असून, उर्वरित पाच प्रकल्पांची व्यवहार्यता तपासायचे काम सुरू आहे.

२५ हजार अतिरिक्त गृहसाठा
या रखडलेल्या पुनर्वसन प्रकल्पांच्या माध्यमातून म्हाडाला सुमारे २५००० अतिरिक्त गृहसाठा उपलब्ध होण्याचे उद्दिष्ट आहे. या पुनर्वसन प्रकल्पांतून प्रकल्पग्रस्तांसाठी किती घरे निर्माण होतील याबाबतचा आढावाही घेण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकल्पांमधील अपात्र झोपडपट्टीधारकांना निष्कासित करण्याची कार्यवाही दोन्ही प्राधिकरणांनी तत्काळ करावी, असेही निर्देश संजीव जयस्वाल यांनी दिले.
----------
मालवणी येथे सर्वात मोठा प्रकल्प
म्हाडा व झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणातर्फे संयुक्त भागीदारी तत्त्वावर राबवल्या जाणाऱ्या पुनर्विकास प्रकल्पांमध्ये मालवणी मालाड येथील प्रकल्प सर्वात मोठा असून, या ठिकाणी १४००० झोपडीधारक आहेत. या सर्व झोपडीधारकांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण लवकरच केले जाणार आहे. त्याकरिता अतिरिक्त मनुष्यबळाचा वापर केला जाणार आहे. म्हाडा ज्या १७ प्रकल्पांना चालना देणार आहे, त्यापैकी ज्या प्रकल्पांच्या ठिकाणी पोहोच रस्ता नसेल, त्या ठिकाणी पोहोचण्याकरिता दोन्ही प्राधिकरणांनी तत्काळ कार्यवाही करून रस्ता तयार केला जाणार आहे.
-----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com