महाराष्ट्र परिवहनमध्ये गुजरात पॅटर्न
महाराष्ट्र परिवहनमध्ये गुजरात पॅटर्न
गुजरात परिवहन महामंडळाची एसटीत एकात्मिक नियंत्रण प्रणाली येणार
सकाळ वृत्तसेवा
गांधीनगर, ता १८ : गुजरात परिवहन महामंडळामार्फत चालवण्यात येणारी एकात्मिक नियंत्रण प्रणाली अत्यंत चांगली असून, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्येदेखील अशा प्रकारची सुविधा असणे गरजेचे असल्याचे मत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केले. त्यामुळे एसटीतही गुजरात परिवहन महामंडळाची एकात्मिक नियंत्रण प्रणाली सुरू होण्याची शक्यता आहे. ते गुजरात राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसपोर्ट प्रकल्पाची माहिती घेताना बोलत होते.
या वेळी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे प्रभारी उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विवेक भीमनवार, वाहतूक महाव्यवस्थापक नितीन मैद, महाव्यवस्थापक नंदकुमार कोलारकर, बांधकाम महाव्यवस्थापक दिनेश महाजन हे अधिकारीदेखील दौऱ्यात सहभागी होत आहेत.
या दौऱ्यादरम्यान गुजरात राज्याचे परिवहन मंत्री हर्ष संघवी यांच्यासोबतदेखील मंत्री सरनाईक यांची बैठक झाली. या बैठकीत दोन्ही राज्यांच्या परिवहन सेवेसंदर्भात चर्चा करण्यात आली.
या वेळी गुजरात राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक एम. नागार्जन यांनी शिष्टमंडळाला त्यांच्या परिवहन सेवेची माहिती दिली.
या वेळी गुजरातमधील अहमदाबाद व वडोदरा येथील बसपोर्टची पाहणी मंत्री सरनाईक व त्यांच्या शिष्ठमंडाळाने केली. या वेळी बस स्थानकावरील वेगवेगळ्या सोयी-सुविधा कशाप्रकारे प्रवाशांना दिल्या जातात, याबद्दलची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी शिष्टमंडळात दिली.
--------------------------------
प्रवासी विश्रांतीगृह
विशेष करून तेथील प्रशासनाने बस स्थानकावर थोडेशा विश्रांतीसाठी थांबणाऱ्या प्रवाशांना ‘प्रवासी विश्रांतीगृह’ कमी किमतीमध्ये बस स्थानकावर उपलब्ध करून दिले आहे. त्याचे कौतुक मंत्री सरनाईक यांनी केले तसेच गुजरात परिवहन महामंडळाच्या अत्याधुनिक बसची पाहणीदेखील त्यांनी या वेळी केली.
-----------------------------
नावीन्यपूर्ण योजना
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व लोकप्रतिनिधींना मार्गदर्शन करताना सांगितले होते, की इतर राज्यात ज्या चांगल्या गोष्टी घडत आहेत त्यांना भेट देऊन त्या आपल्या राज्यात कशा अमलात आणता येतील याचा अभ्यास करावा, जेणेकरून विविध ठिकाणच्या नावीन्यपूर्ण योजना आपल्या राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध होतील. याचाच एक भाग म्हणून गुजरात राज्य मार्ग परिवहन सेवेमार्फत चालवल्या जाणाऱ्या बसपोर्ट प्रकल्पाची माहिती घेण्यासाठी दौऱ्याची आखणी केली होती.
===
बस स्थानक हे त्या शहराचे मध्यवर्ती ठिकाण असते. किंबहुना ते अशा मोक्याच्या ठिकाणी असते की जिथे व्यापार- उदीम विकसित होत असतो. हे ओळखून गुजरात राज्य मार्ग परिवहन महामंडळाने बस स्थानक परिसरामध्ये व्यावसायिक वापरासाठी ‘व्यापारी संकुल’ आणि त्यामधून येणाऱ्या महसुलाद्वारे प्रवाशांसाठी अत्याधुनिक सोयी - सुविधायुक्त ‘बसपोर्ट’ निर्माण करून एक प्रकारे व्यापार आणि प्रवासी दळणवळणाचा सुंदर मिलाफ केल्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

